पोलीस पाटलांना मिळणार कोरोनाचे संरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 11:25 PM2021-02-20T23:25:19+5:302021-02-21T01:11:37+5:30
नाशिक: कोरोना रोखण्यासाठी फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस प्राधान्याने दिली जात आहे. आता गावखेड्यात नागरिकांमध्ये काम करणाऱया पोलीस पाटलांचेदेखील लसीकरण केले जाणार असून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पोलीस पाटलांची माहिती मागविली आहे. पोलीस पाटलांना कोरोना लसीचे संरक्षण देण्याचा राज्यातील हा पहिलाच प्रयोग ठरणार आहे.
नाशिक: कोरोना रोखण्यासाठी फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस प्राधान्याने दिली जात आहे. आता गावखेड्यात नागरिकांमध्ये काम करणाऱया पोलीस पाटलांचेदेखील लसीकरण केले जाणार असून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पोलीस पाटलांची माहिती मागविली आहे. पोलीस पाटलांना कोरोना लसीचे संरक्षण देण्याचा राज्यातील हा पहिलाच प्रयोग ठरणार आहे.
कोरोनाशी लढणाऱ्या फ्रंटलाईन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात येत असून पहिल्या टप्प्यातील लसीकरण पूर्ण करण्यात आलेले आहे. लसीकरण सुरक्षित असल्याचा संदेश देण्यासाठी नागरिकांच्या संपर्कात येणाऱ्या अधिकाऱ्यांनीदेखील लसीचा पहिला डोस घेतलेला आहे. दुसरीकडे कोरोनाच्या रुग्ण संख्येतही वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंंता वाढलेली आहे. त्यामुळे लसीचे महत्त्वदेखील वाढले आहे.
अनलॉकच्या प्रक्रियेनंतर ग्रामीण भागातदेखील रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातील रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. यासाठी जनतेमध्ये वावरणाऱ्या आणि कोरोनायोद्धा म्हणून काम करणाऱ्या पोलीस पाटलांना देखील संरक्षण देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तालुकानिहाय पोलीस पाटलांची माहिती मागविली आहे.
जिल्ह्यात सुमारे दीड हजार इतके पोलीस पाटील असून राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा नाशिकची संख्या अधिक आहे. गावखेड्यात सर्वसामान्यांपासून शासकीय अधिकाऱ्यांपर्यंत वावरणाऱ्या आणि कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या पोलीस पाटलांनी कोरोनाच्या संकट काळात मोठे काम केलेले आहे. किंबहूना पोलीस पाटलांनीदेखील लस देण्याची मागणी केलेली आहे. याची दखल घेत जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी पोलीस पाटांनादेखील कोरोना लसीचे संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
पोलीस पाटलांना कोरोना लस मिळावी, अशी संघटनेची मागणी होतीच. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांना निवेदनही देण्यात आले होते. मागीलवर्षी कोरोनामुळे राज्यात अनेक पोलीस पाटलांना लागण झाली होती तर अनेकांना जीव गमवावा लागला. त्यामुळे लसीची मागणी करण्यात आलेली होती. त्याची प्रशासनाने दखल घेतली.
- कैलास बच्छाव, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटना.
कोरोना नियंत्रणासाठी पोलीस पाटलांना पुढे राहून कामे करायची आहेत. गावखेड्यात, वस्तीत काम करणाऱ्या पोलीस पाटलांना देखील लसीची सुरक्षा देणे आवश्यक आहे. त्यामुळे महसूल विभागाच्या गटातून सर्व पोलीस पाटलांचे लसीकरण केले जाणार आहे. तहसीलदार प्रत्येक तालुकानिहाय पोलीस पाटलांची माहीती घेऊन येत्या २६ तारखेपर्यंत मोहीम पूर्ण केली जाईल.
- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी.