वाहनाच्या धडकेत पोलीस कर्मचारी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 12:01 AM2020-07-04T00:01:12+5:302020-07-04T00:47:21+5:30

गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनेक भागांत अपघाताचे प्रकार वाढले आहेत. पोलीस कर्मचाऱ्याच्या दुचाकीला भरधाव कारचालकाने धडक दिल्याची घटना गुरुवारी (दि. २) लॅमरोड परिसरात घडली.

Police personnel injured in vehicle collision | वाहनाच्या धडकेत पोलीस कर्मचारी जखमी

वाहनाच्या धडकेत पोलीस कर्मचारी जखमी

Next

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनेक भागांत अपघाताचे प्रकार वाढले आहेत. पोलीस कर्मचाऱ्याच्या दुचाकीला भरधाव कारचालकाने धडक दिल्याची घटना गुरुवारी (दि. २) लॅमरोड परिसरात घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यातील हवालदार नानासाहेब बाळू कुंदे यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हवालदार कुंदे हे गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास ड्युटी संपल्यानंतर नाशिकरोडकडून देवळाली कॅम्पकडे जात होते. यावेळी समोरून आलेल्या कारने (एमएच १८, डब्ल्यू ९५६६) त्यांना जोरदार धडक दिली. यात कुंदे यांच्या हातापायाला मार लागल्याने ते जखमी झाले आहेत.
महिलेची सोन्याची पोत खेचून नेली
इंदिरानगर : पाथर्डी फाटा येथील मुरलीधरनगर परिसरात पायी जाणाºया ज्येष्ठ महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने चाळीस हजार रुपये किमतीची सोन्याची पोत खेचून नेल्याची घटना घडली आहे. सोनसाखळी चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कल्पना रवींद्र गवांदे (६०, मुरलीधरनगर) गुरुवारी (दि.२) रोजी भाजीखरेदी करून घरी परत येत असताना अयोध्या कॉलनी रस्त्यावर आल्या असता दुचाकीवरील दोघा इसमांनी मंदिर कोठे आहे, अशी विचारणा केली. तसेच त्यांच्याजवळ येऊन त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचली. गवांदे त्यांच्या पाठीमागे पळाल्या असता त्या जमिनीवर पडल्या त्यामुळे चोरट्यांनी पळ काढला.
अमृतधाम परिसरात दुचाकीचोरी
अमृतधाम परिसरातून दुचाकी चोरीला गेल्याची घटना बुधवारी (दि. १) घडली. राजेंद्र देवीदास डोमाडे (वय ३३, रा. मॉडेल कॉलनी, जेलरोड) यांनी त्यांची दुचाकी (क्र. एमएच १५ डीडब्लू ९९४०) आॅटो व्हिल केअर, बिडीकामगार चौक, अमृतधाम येथे पार्क केली होती. यावेळी अज्ञात चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेस मारहाण करून विनयभंग
सातपूर परिसरातील काळे चौकातून घराकडे जात असलेल्या महिलेस अडवून लाकडी दांडक्याने मारहाण, शिवीगाळ व विनगभंग केल्याचा धक्कादायक घटना घडली अहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी १० वाजता पीडित महिला काळे चौक येथून घराकडे पायी जात होती. यावेळी पाठीमागून आलेल्या संशयित किशोर उर्फ संजय रामलाल चव्हाण, मनीषा संजय चव्हाण, प्रेरणा संजय चव्हाण (रा. स्वामी समर्थ चौक, सातपूर) यांनी पीडितेला मारहाण केली. तसेच मारून टाकण्याची धमकी देत विनयभंगही केल्याची घटना घडली. या झटापडीत पीडितेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचे मंगळसूत्र, पर्स तोडून संशयितांनी नुकसान केल्याची फिर्याद पीडितेने दिली आहे.
भद्रकालीत तरुणाला मारहाण
‘विनाकारण उभा राहू नको, घरी जा’ असे सांगितल्याचा राग आल्याने
एकास मारहाण केल्याची घटना भद्रकाली परिसरात घडली. याप्रकरणी
निखील अनिल बेग (वय २३, रा. टाकळीरोड ) याने फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार संशयित आरोपी सुनील अजित बेग व मयूर सुनील बेग
(रा. भद्रकाली) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Police personnel injured in vehicle collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.