पोलीस कर्मचारी परतीच्या वाटेवऱ़़
By admin | Published: September 19, 2015 10:43 PM2015-09-19T22:43:32+5:302015-09-19T22:44:56+5:30
पोलीस कर्मचारी परतीच्या वाटेवऱ़़
नाशिक : राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून सिंहस्थातील बंदोबस्तासाठी आलेले व गत दोन महिन्यांपासून शहरात वास्तव्यास असलेले सुमारे १२ हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी रविवारी (दि़२०) परतीच्या मार्गाला लागणार आहेत़ कुंभपर्वातील बंदोबस्ताचा अनुभव गाठीशी बांधून परतणाऱ्या या कर्मचाऱ्यांना पाठविण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे़
बारा वर्षांपूर्वी घडलेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सुमारे दोन वर्षांपासून पोलीस प्रशासनाचे बंदोबस्ताचे नियोजन सुरू होते़ या बंदोबस्तासाठी पोलिसांनी आधार घेतला तो रमणी आयोगाचा़ राज्यशासनानेही पोलीस यंत्रणेला बंदोबस्तासाठी आवश्यक पोलीस बलासह, तांत्रिक सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या़ याबरोबरच स्वतंत्र कुंभमेळा मंत्र्याची नियुक्तीही केली होती़ सिंहस्थासाठी शहरात रमणी आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पोलीस बंदोबस्त व बॅरिकेडिंगचे नियोजन करण्यात आले होते. तसेच राज्यभरातील पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड आदिंसह अनुभवी अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली होती.
सुमारे अठरा हजार पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते़ त्यामध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस आयुक्त, १४ पोलीस उप आयुक्त, ३५ सहायक आयुक्त, १८६ पोलीस निरीक्षक , ७३० सहायक निरीक्षक, ९०७२ पोलीस कर्मचारी, १३ बॉम्बशोधक पथके, एसआरपीएफ कंपन्या, शीघ्र कृती दल यांचा समावेश होता. पर्वणीसाठी आलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहराची कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी सुमारे ७२ तास कर्तव्य बजावले़ त्यामध्ये बुडणाऱ्यांना जीवदान देण्याबरोबरच साधू-महंतांच्या,भाविकांच्या सुरक्षेचीही जबाबदारी पार पाडली़ सुमारे दोन महिन्यांच्या वास्तव्यानंतर या सर्वांची शहराशी जवळीक निर्माण झाल्याच्या प्रतिक्रिया काही पोलीस कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या़ सिंहस्थ बंदोबस्तातील सर्व कर्मचारी उद्या मूळ सेवेत परतणार आहेत़. (प्रतिनिधी)