पेट्रोल पंपावर पोलीस; गुन्हेगारांना मोकळे रान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:18 AM2021-09-08T04:18:56+5:302021-09-08T04:18:56+5:30

सिडको : नागरिकांना दुचाकी चालविताना हेल्मेट सक्तीचे करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी पेट्रोल पंपावर हेल्मेट असेल तरच पेट्रोल दिले जाईल, ...

Police at petrol pumps; Free the criminals | पेट्रोल पंपावर पोलीस; गुन्हेगारांना मोकळे रान

पेट्रोल पंपावर पोलीस; गुन्हेगारांना मोकळे रान

Next

सिडको : नागरिकांना दुचाकी चालविताना हेल्मेट सक्तीचे करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी पेट्रोल पंपावर हेल्मेट असेल तरच पेट्रोल दिले जाईल, अशी भूमिका घेऊन प्रत्येक पेट्रोल पंपावर पोलीस बंदोबस्त दिला आहे. परंतु अगोदरच पोलीस ठाण्यांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी असताना त्यातच २४ तासांसाठी पेट्रोलपंपावर पोलिसांची नेमणूक करण्यात आल्याने गुन्हेगारी रोखण्याकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अठराहून अधिक पेट्रोल पंप असून, प्रत्येक पंपावर पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे. या पोलिसांना पेट्रोल पंपावर येणाऱ्या नागरिकांकडे हेल्मेट नसेल तर त्यांना पेट्रोल भरून न देणे तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन शिफ्टमधील अठराहून अधिक कर्मचारी दररोज सकाळी सहा ते रात्री दहा याच कामात व्यस्त आहेत. मुळात अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिडकोसह परिसरात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. मागील एकाच महिन्यात अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन खुनाच्या घटनादेखील घडल्या आहेत. याबरोबरच चौकाचौकात तसेच उद्यानामधील टवाळखोर यांच्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. परंतु असे असले तरी पोलिसांकडून मात्र यावर अंकुश ठेवण्यात अपयश येत असल्याचे चित्र आहे. पोलीस आयुक्तांनी केलेली हेल्मेट सक्तीची कारवाई यापुढील काळात अधिक जोमाने राबविण्याचा प्रशासनाचा विचार असला तरी परिसरातील वाढती गुन्हेगारी हेदेखील पोलिसांपुढे एक मोठे आव्हान आहे. यामुळे त्याकडेदेखील पोलिसांनी लक्ष देण्याची गरज असून, अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीचा विचार केला तर सिडको, अंबड एमआयडीसी, घरकुल, चुंचाळे, खुटवड नगर, जुने सिडको, उत्तम नगर, त्रिमूर्ती चौक, शुभम पार्क, उंटवाडी, उपेंद्र नगर असा मोठा परिसर आहे. महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने अनेक गुन्हेगारांनीदेखील डोकेवर काढल्याने त्याला आळा घालण्यासाठी पोलीस अपुरे पडू लागले आहेत. दोन दिवसांवरच गणेशोत्सव येऊ घातला असून, यामुळेदेखील पोलिसांवरील ताण अधिक वाढणार आहे. असे असताना पोलिसांकडून नो हेल्मेट नो पेट्रोल ही मोहीम राबवली जात असली तरी याबरोबरच वाढत्या गुन्हेगारीकडेदेखील पोलीस आयुक्तांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Web Title: Police at petrol pumps; Free the criminals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.