फार्महाउसमध्ये पोलिसांचा छापा; आठ तलवारी, दोन चॉपर अन् फायटर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2020 05:31 PM2020-11-01T17:31:58+5:302020-11-01T17:32:55+5:30
शस्त्रसाठ्याची एकुण किंमत सुमारे ३१ हजाार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या स्वत:च्या फार्महाउसमध्ये बेकायदेशीरपणे वरीलप्रकारे हत्यारे आढळून आली
नाशिक : शहरात शस्त्रबंदी आदेश लागू असताना या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द पोलिसांनी धडक कारवाई सुरु केली आहे. गुन्हे शाखेच्या युनीट-१च्या पथकाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक आनंदा वाघ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्याअधारे त्यांनी मखमलाबाद शिवारातील माळी वस्ती येथील एका फार्महाऊसवर धाड टाकली. तेथून आठ तलवारी, दोन चॉपर व फायटर अशा प्राणघातक हल्ल्यांचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी रहिवासी संशयित प्रणील प्रकाश पठाडे (३२) यास पोलिसांनी अटक केली आहे.
गुन्हे शाखेचे नवनियुक्त उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी सर्व गुन्हे शाखांचे युनीट व त्यांची पथके सतर्क करत शहरात घडणाऱ्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची कुठलीही गय करु नये असे फर्मान सोडले आहे. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकांनी आपले 'नेटवर्क' अधिक सक्षम करण्यावर भर दिला आहे. या शस्त्रसाठ्याची एकुण किंमत सुमारे ३१ हजाार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या स्वत:च्या फार्महाउसमध्ये बेकायदेशीरपणे वरीलप्रकारे हत्यारे आढळून आली. यानुसार पोलीस आयुक्तांच्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस नाईक विशाल काठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित पठाडेविरुद्ध शस्त्रबंदी कायद्यान्वये म्हसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यास पोलिसांनी अटक करून म्हसरूळ पोलिसांच्या हवाली केले आहे. पुढील तपास सहायक उपनिरीक्षक कारवाळ हे करीत आहेत.