गंगापूररोडवरील स्पा-सेंटरवर पोलिसांचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 10:07 PM2020-06-09T22:07:03+5:302020-06-09T22:08:18+5:30
कोरोनाचा संसर्ग शहरात अधिक फैलावू नये, यासाठी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांनी शहरासह संपुर्ण जिल्ह्यात सलून व स्पा-सेंटर सुरू करण्याबाबत परवानगी दिलेली नाही.
नाशिक : कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी राज्य सरकारकने सलून, स्पा-पार्लर बंद ठेवण्याचे दिलेले आदेश अद्याप कायम असून ही दुकाने उघडण्यास कुठलीही परवानगी देण्यात आलेली नाही. नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत सर्रासपणे गंगापूररोडवर अशाचपध्दतीजे एक स्पा-सेंटर सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे बनावट ग्राहक पाठवून खात्री करत छापा मारला.
कोरोनाचा संसर्ग शहरात अधिक फैलावू नये, यासाठी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांनी शहरासह संपुर्ण जिल्ह्यात सलून व स्पा-सेंटर सुरू करण्याबाबत परवानगी दिलेली नाही. तरीदेखील गंगापूररोडवरील थत्तेनगर या भागात गणेशकुबेर व्यापारी संकुलाच्या दुसऱ्या मजल्यावर अनधिकृतपणे विनापरवानगी स्पा-सेंटर चालविले जात असल्याची गोपनिय माहिती थेट पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना मिळाली. त्यांनी तत्काळ गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अंचल मुदगल यांना याबाबत कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार मुदगल यांच्यासह उपनिरिक्षक सचिन शेंडकर यांच्या पथकाने या ठिकाणी दाखल होऊन दोन पंचांसमक्ष एक बनावट ग्राहक स्पा-सेंटरमध्ये पाठविला. सेंटणमध्ये संबंधित व्यावसायिकाने त्यास प्रवेश देत त्याच्याकडून रक्कम आकारून त्याची बॉडी मसाज करून देण्यास तयारी दर्शविल्याची खात्री पटल्यानंतर पथकाने या ठिकाणी छापा टाकला. स्पा-सेंटरचालक प्रदीपकुमार लक्ष्मण माने(३०. रा. वैभव कॉलनी राजीवनगर), व्यवस्थापक ज्ञानेश्वर बबन गवारे (रा. बजरंगवाडी, द्वारका) यांना रंगेहात ताब्यात घेतले. पथकाने पंचनामा करून संबंधितांविरूध्द गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास गंगापूर पोलीस करत आहेत.