न्यायडोंगरीतील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 07:28 PM2017-07-23T19:28:14+5:302017-07-23T19:28:14+5:30
ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथक ; रोख रकमेसह लाखोंचा मुद्देमाल जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथील जुगार अड्ड्यावर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने छापा टाकून ४० हजार रुपयांच्या रोख रकमेसह लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे़ पोलिसांनी आठ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले असून, जुगार अड्डाचालक व चौघे जुगारी मात्र पोलिसांना चकमा देऊन फरार झाले आहेत.
ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांना न्यायडोंगरीमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती़ त्यांनी मनमाड-नांदगाव परिसरातील गस्तीवरील विशेष पथकाला कारवाईच्या सूचना दिल्यानंतर या जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला़ मशिदीच्या पाठीमागील मोकळ्या जागेवर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये जुगार खेळणारे संशयित मुस्तकिन बाबू अत्तार (२८, रा. न्यायडोंगरी, ता. नांदगाव), नेमीचंद बिरदीचंद जैन (७१, रा. न्यायडोंगरी), विकास बाबासाहेब बोंडारे (२५, रा. रोहिणी, ता. चाळीसगाव, जि. जळगाव), समाधान राजेंद्र आव्हाड (२१, रा. हातगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव), गोकुळ गबलू राठोड (३८, रा. न्यायडोंगरी), दिलीप किसन राठोड (२७, रा. न्यायडोंगरी), संदीप ज्ञानदेव दिघोळे (२८, रा. रोहिणी, ता. चाळीसगाव, जि. जळगाव), अखिल इमाम पिंजारी (३२, रा. न्यायडोंगरी) या आठ जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे़
पोलिसांनी जुगाऱ्यांकडून ४१ हजार ९६० रुपयांची रोख रक्कम, मोबाइल, नऊ दुचाकी असा ३ लाख ३५ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ दरम्यान, या जुगार अड्ड्याचा चालक संशयित रफिक गणी शेख (रा. न्यायडोंगरी) याच्यासह चिंग्या आव्हाड, अविनाश आहेर, रवींद्र सोमवंशी, इलियास शहा, प्रदीप जयस्वाल, विठ्ठल राठोड (सर्व रा. न्यायडोंगरी) हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.