नाशिकमधील अनधिकृत कॉल सेंटरवर पोलिसांचे छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 01:30 AM2018-09-23T01:30:57+5:302018-09-23T01:31:19+5:30
अनधिकृत कॉल सेंटरवरून अमेरिकेतील नागरिकांना फोन करून त्यांच्या एसएसए पॉलिसी कोडचा अन्य व्यक्ती गैरवापर करत असून, तुमच्यावर गुन्हा दाखल होईल, अशी धमकी देऊन आर्थिक फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा उपनगर पोलिसांनी शनिवारी (दि़ २२) पर्दाफाश केला़
नाशिकरोड : अनधिकृत कॉल सेंटरवरून अमेरिकेतील नागरिकांना फोन करून त्यांच्या एसएसए पॉलिसी कोडचा अन्य व्यक्ती गैरवापर करत असून, तुमच्यावर गुन्हा दाखल होईल, अशी धमकी देऊन आर्थिक फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा उपनगर पोलिसांनी शनिवारी (दि़ २२) पर्दाफाश केला़ नाशिकरोड परिसरातील शिखरेवाडीतील स्टार
झोन मॉल व काठे गल्ली परिसरातील एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये अनधिकृतपणे सुरू असलेल्या या कॉल सेंटरवर पोलिसांनी छापामारी करून अकरा संशयिताना अटक केली आहे़ काही महिन्यांपूर्वी ठाणे पोलिसांनी अशाच प्रकारच्या आठ-दहा कॉल सेंटरवर छापा मारून कारवाई केली होती़ उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर
रायते, उपनिरीक्षक गणेश जाधव, कॉन्स्टेबल अमोल टिळेकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे त्यांनी अत्याधुनिक यंत्रणा व इंटरनेटचा वापर करून अमेरिकन नागरिकांच्या होणाºया फसवणुकीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
शिखरेवाडी स्टार झोन मॉल एस-५ या गाळ्यामध्ये उपनिरीक्षक गणेश जाधव व काठेगल्ली परिसरातील श्रीमती रंगुबाई जुन्नरे हायस्कूलमधील इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्यासह पोलीस पथकाने शुक्रवारी रात्री २ वाजेच्या सुमारास एकाचवेळी छापा मारून अनधिकृत कॉल सेंटरमधील ११ युवकांना अटक केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून अनधिकृत कॉल सेंटर बिनदिक्कत सुरू होते. शिखरेवाडी व काठेगल्ली परिसरातील दोन्ही अनधिकृत कॉल सेंटर रात्री १० ते पहाटे ४ वाजेपर्यंत सुरू राहत होते. या कॉल सेंटरवरून दररोज १०० कॉल केले जात होते. दोन्ही कॉल सेंटरवरून आतापर्यंत ५४ हजार अमेरिकन नागरिकांना कॉल करण्यात आले असून, त्यामध्ये किती जणांची फसवणूक झाली आहे हे तपासात उघडकीस येणार आहे.
याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दोन्ही अनधिकृत कॉल सेंटरमधील मोईन आसिम खान (रा. संसरी लेन), चेतन बलाई रॉय (रा. पोरजे मळा वडनेर दुमाला), ऋतिक तेजपाल कटारिया (रा. दयाल कॉटेज, श्यामलाल धामाई (रा. सूर्यनगरी सोसायटी), स्वामीयल बाळकृष्ण नायडू (रा. एसपी पॉवर हाउस क्वार्टर), रोहाण सलीम खान (रा. मोनार्क सोसायटी देवळाली कॅम्प), शाहरूख युनूस शेख (रा. मुल्लावाडा भगूर), ऋषिकेश दिलीप माळवे (रा. रंगुबाई जुन्नरे शाळेजवळ, काठेगल्ली), दिनेश सतीश अग्रवाल (रा. भंडारदरारोड घोटी), शिवा रवि स्वामी (रा. लोटस हॉटेलजवळ विहितगाव), शेख सर्फराज फय्याज (रा. संसरी) या अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संशयितांना नाशिकरोड न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
अशी केली जात होती फसवणूक
अहमदाबाद येथील एक व्यापारी संपूर्ण भारतात अशा प्रकारचे अनधिकृत कॉलसेंटर चालवित असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. अमेरिकन रहिवाशांना अनधिकृत कॉल सेंटरवरून ‘स्कायपी अॅप’चा वापर करून फोन केला जात होता. अमेरिकन नागरिकांना तुमच्या एसएसए (सोशल सिक्युरिटी एजन्सी) पॉलिसीची मुदत संपली आहे, पॉलिसीच्या कोडचा अन्य व्यक्ती दुरुपयोग करत आहे. त्यामुळे तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा धाक दाखवत दम दिला जात होता. एसएसए पॉलिसी कोडची सुरक्षितता टिकविण्यासाठी व गैरवापर थांबविण्यासाठी ‘वॉलमार्ट’ कार्ड खरेदी करून त्यावरील डिजिटल क्रमांक एसएमएस करा, असे सांगितले जात होते. त्यामुळे अमेरिकन व्यक्तीने वॉलमार्ट खरेदी केल्यानंतर त्यावरील डिजिटल क्रमांक एसएमएसद्वारे कळविल्यानंतर तो क्रमांक कॉल सेंटरवरून अहमदाबादमधील त्या व्यापाºयास कळविला जात होता. भारतात अनधिकृत कॉल सेंटर चालविणारा तो व्यापारी वॉलमार्ट कार्डचा डिजिटल क्रमांक पुन्हा अमेरिकेतील आपल्या इतर सहकाºयांना कळवत होता. त्यानुसार वॉलमार्ट कार्ड कंपनीकडून एका डिजिटल क्रमांकाचे ५०० डॉलर दिले जात होते. अमेरिका व भारतातील ही साखळी निम्मे-निम्मे पैसे वाटून घेत होती. या पद्धतीनुसार अमेरिकन नागरिकांना एसएसए पॉलिसीच्या कोडचा गैरवापर होत असल्याचा दम देत ‘वॉलमार्ट’ खरेदी करण्यास लावून आर्थिक लुबाडणूक केली जात होती.
मुख्य संशयित मोदी
संपूर्ण भारतात अनधिकृत कॉल सेंटर चालविणारा अहमदाबादमधील व्यापारी मोदी असल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. यापूर्वी ठाण्यामध्ये पोलिसांनी अशाच अनधिकृत कॉल सेंटरवर छापा मारून कारवाई केल्यानंतर ‘मोदी’लादेखील अटक केल्याचे बोलले जाते. त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली आहेत.
स्कायपी अॅपचा वापर
आर्थिक फसवणुकीचे स्कॅण्डल चालविण्यासाठी कॉल सेंटरमधून स्कायपी अॅपच्या मदतीने फोन केले जात होते. स्कायपी अॅप फक्त विन्डो आॅपरेटिंगच्या मोबाइलवरच चालते. मोफत व पैसे आकारून असे दोन प्रकारचे स्कायपी अॅप असून, याद्वारे कुठेही फुकट व एकावेळी तीन-चार जणांशी बोलू शकतो. विशेष म्हणजे स्कायपी अॅपवरील फोनद्वारे बोलणे रेकॉर्डिंग होऊ शकत नसल्याचे तपासात पुढे आले आहे.
इंग्रजी बोलणारी मुले
अनधिकृत कॉल सेंटरवर दहावी-बारावी पास, नापास मुले कामाला आहेत. ही मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकली असून, त्यांना उत्तम इंग्लिश येते. त्याचाच फायदा हे रॅकेट चालविणाºया संबंधितांनी घेतल्याचे बोलले जात आहे.
अनिवासी भारतीयांची लुबाडणुकीची शक्यता
अमेरिका शासनाकडून प्रत्येक व्यक्तीची एसएसए पॉलिसी काढली जाते. त्या पॉलिसीच्या सुरक्षितेचा धाक दाखवून अनधिकृत कॉल सेंटरवरून फोन करून होणाºया लुबाडणुकीमध्ये अनिवासी भारतीयांची संख्या जास्त असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.