पोलीसपाटील भरतीची चौकशी
By admin | Published: May 23, 2016 11:21 PM2016-05-23T23:21:31+5:302016-05-23T23:21:55+5:30
दप्तर ताब्यात : तक्रारींची होणार खातरजमा
नाशिक : निफाड व सिन्नर तालुक्यातील पोलीसपाटील, कोतवाल भरतीत उघड उघड आर्थिक देवाण-घेवाणीचे झालेले आरोप, गुणवत्ताधारकांना डावलून दहावी उत्तीर्णांची लावलेली वर्णी, चेहरे पाहून केलेले गुणदान अशा विविध प्रकारच्या तक्रारी निफाड प्रांत अधिकाऱ्याच्या विरोधात प्राप्त झाल्याने अखेर जिल्हा प्रशासनाने या सर्व प्रकाराची चौकशी करण्याचा निर्णय घेतला असून, भरती प्रक्रियेचे दप्तर व गुणदानाच्या पद्धतीबाबत माहिती मागविली आहे.
‘लोकमत’ने यासंदर्भात पुराव्यानिशी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पोलीसपाटील भरतीत अन्याय झालेल्या उमेदवारांनी एकत्र येत न्यायालयीन लढा लढण्याचा निर्णय घेतला आहे. या साऱ्या गैरप्रकाराची जिल्हाधिकारी बाळकृष्णन् राधाकृष्णन् यांनी गंभीर दखल घेत अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे यांना चौकशीचे आदेश दिले असून, पोलीसपाटील व कोतवाल भरतीबाबत उमेदवारांच्या दाखल झालेल्या तक्रारी व प्रत्यक्ष निफाड प्रांत अधिकाऱ्याने राबविलेली पद्धत या दोन्ही गोष्टी तपासून पाहण्यात येणार असल्याचे बगाटे यांनी सांगितले. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलविल्यानंतर करावयाच्या गुणदानाची पद्धत जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेली असताना निफाड प्रांत अधिकाऱ्याने त्यात बदल केला किंबहुना गुण देण्याचा रकाना रिकामा ठेवल्याबाबतही उमेदवारांनी तक्रार केलेली आहे, त्या अनुषंगानेही गुणदान करताना नेमक्या कोणत्या पद्धतीचा अवलंब केला याचा उलगडा करण्यासाठी लेखी खुलासा मागविण्यात येणार असल्याचे बगाटे यांनी सांगितले. गुणदानात करण्यात आलेले भेदाभेद व गुणवंतांना डावलण्याच्या प्रकाराच्या चौकशीसाठी संपूर्ण दप्तर मागविण्यात आले असून, त्याची दोन दिवसांत खातरजमा करण्यात आल्यावर यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांवर खरोखरच अन्याय झाला त्यांना न्याय देण्यासाठी फेर प्रक्रिया राबविण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आला असून, यासंदर्भातील चौकशी पूर्ण होत नाही तोवर नियुक्ती देण्यावर स्थगिती देण्यात आल्याची माहितीही अपर जिल्हाधिकारी बगाटे यांनी दिली.