पोलीसपाटील भरतीची ‘मॅट’कडून दखल
By admin | Published: September 2, 2016 12:26 AM2016-09-02T00:26:56+5:302016-09-02T00:27:06+5:30
प्रशासन बेजार : कायदा सादर करण्याचे आदेश
नाशिक : नातेवाइकावर गुन्हा दाखल असल्यास त्याचा अर्थ संबंधित व्यक्ती ही गुन्हेगारच आहे, असे समजून त्याला त्याच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा कायदा आहे का? असल्यास तो सादर करा असे निर्देश ‘मॅट’ने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. पोलीसपाटील भरती प्रकरणी झालेल्या गोंधळाबद्दल मीना कुंभार्डे या अन्यायग्रस्त उमेदवाराने दाखल केलेल्या दाव्याची सध्या सुनावणी सुरू आहे.
सिन्नर व निफाड तालुक्यासाठी राबविण्यात आलेल्या पोलीसपाटील भरतीत अनेक गैरप्रकार उघडकीस येऊनही प्रशासनाने याप्रकरणी घेतलेली भूमिका संशयास्पद असल्याच्या कारणावरून जवळपास नऊ उमेदवारांनी मॅटमध्ये धाव घेतली आहे. मीना कुंभार्डे या सिन्नर तालुक्यातील नांदुर्डी येथील महिलेला पोलीसपाटील भरतीच्या लेखी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळाले, परंतु मौखिक मुलाखतीत प्रांत अधिकाऱ्याने मुद्दामहून डावलले व कुंभार्डे यांच्याऐवजी आशा निकम या महिलेची निवड केली होती. कुंभार्डे यांनी याप्रकरणी माहिती अधिकार कायद्यान्वये माहिती मागविली असता, कुंभार्डे यांच्या माहेरच्या व्यक्तींविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद पोलीस दप्तरी असल्यामुळे मीना कुंभार्डे यादेखील गुन्हेगार प्रवृत्तीच्या असल्याचा निष्कर्ष काढून प्रांत अधिकाऱ्याने त्यांची नियुक्ती नाकारली होती. कुंभार्डे यांनी पोलीस ठाण्यात अर्ज देऊन त्यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती मागविली असता, त्यांच्याविरुद्ध कोणताच गुन्हा नसल्याचे पत्र पोलिसांनी दिले होते. याचाच अर्थ निफाड प्रांत अधिकाऱ्याने जाणीपूर्वक काहीतरी हेतू ठेवून कुंभार्डे यांना नाकारतानाच, आशा निकम यांची निवड केल्याची बाब ‘मॅट’ला पटवून देण्यासाठी दावा दाखल केला आहे.