परप्रांतीयांसाठी पोलीस करतो रिक्षांची दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 10:20 PM2020-05-18T22:20:44+5:302020-05-19T00:36:07+5:30
नाशिक :(धनंजय रिसोडकर ) कुणी हजार किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी रेल्वेने चालले तर कुणी पायी चालले, कुणी सायकलवरून कुणी ट्रकमधून तर कुणी रिक्षामधून. कसाराघाटातून नित्यनेमाने जात असलेल्या अशा शेकडो रिक्षांपैकी बंद पडणाऱ्या रिक्षांच्या दुरुस्तीत मदतीचा हात देत त्यांना पुढे मार्गस्थ करण्याचे काम कसाराघाटात सेवारत असलेले पोलीस कर्मचारी सतीश चव्हाण हे करीत आहेत.
नाशिक :(धनंजय रिसोडकर ) कुणी हजार किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी रेल्वेने चालले तर कुणी पायी चालले, कुणी सायकलवरून कुणी ट्रकमधून तर कुणी रिक्षामधून. कसाराघाटातून नित्यनेमाने जात असलेल्या अशा शेकडो रिक्षांपैकी बंद पडणाऱ्या रिक्षांच्या दुरुस्तीत मदतीचा हात देत त्यांना पुढे मार्गस्थ करण्याचे काम कसाराघाटात सेवारत असलेले पोलीस कर्मचारी सतीश चव्हाण हे करीत आहेत. त्यामुळे पोलीस म्हणून सेवा बजावतानाच हे कर्मचारी त्यांच्या रिक्षा दुुरुस्तीच्या कौशल्याचा वापरदेखील या गोरगरीब परप्रांतीयांना करून देत माणुसकीचा झरा कायम असल्याचा प्रत्यय देत आहेत.
हजारो परप्रांतीय ठाण्यातून बाहेर पडत पुढील वाहन मिळेपर्यंत रिक्षाने पुढे जाण्याचा पर्याय स्वीकारत आहेत, तर काही परप्रांतीय आपापल्या मालकीच्या रिक्षांमधून गावांकडे मार्गस्थ होत आहेत. मात्र, कसाºयाच्या घाटातील चढावावर अनेक रिक्षांमध्ये काही ना काही बिघाड होण्याचे प्रकार घडतात. अशावेळी त्या रिक्षाचालकास दुरुस्तीची फारशी माहिती नसल्यास त्या रिक्षाचालकाबरोबरच त्यात बसलेल्या कुटुंबीयांची ओढाताण सुरू होते. रिक्षात बसलेल्या महिलांसह बालकांना रिक्षातून खाली उतरून पायी मार्गक्रमण करणे तर रिक्षाचालक आणि त्या कुटुंबातील कर्त्या व्यक्तीला रिक्षाला ढकलत मेकॅनिक मिळेपर्यंत रिक्षा ढकलणे क्रमप्राप्त बनते. अशावेळी जर एखादा पोलीस त्या रिक्षाचालकाला रिक्षाची दुरुस्तीकरिता मदत करण्यासाठी पुढे सरसावला तर तो त्या कुटुंबीयांसाठी अक्षरश: देवदूतच ठरतो. नाशिक ग्रामीणमध्ये कार्यरत असलेले सतीश चव्हाण हे पोलीस कर्मचारी सध्या कसारा घाटाच्या हद्दीत सेवेवर आहेत. ते पोलीसमध्ये भरती होण्यापूर्वी रिक्षा चालवायचे. तसेच अडीअडचणीच्या वेळी गरज पडल्यास तिची दुरुस्तीदेखील करायचे. त्यामुळे रिक्षाची पूर्ण दुरुस्ती करणे त्यांना अवगत आहे. अनेक रिक्षांना कसाराघाटात काही समस्या निर्माण झाल्यास त्या रिक्षांच्या दुरुस्तीत मदतीचा हात पुढे करीत हा कर्मचारी त्यांना पुढील मार्गक्रमणात सहायक ठरत असल्याने त्यांच्या रूपाने देवदूतच भेटल्याची भावना अनेक रिक्षाचालक आणि कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
-------------------------------------------
मी यापूर्वी रिक्षाचालक असल्यामुळे मला रिक्षा दुरुस्तीचीही बरीच माहिती आहे. त्या अनुभवाचा फायदा बंद पडलेल्या रिक्षाचालक आणि परप्रांतीयांना करून देत आहे. त्यांच्याकडून मिळणारे आशीर्वाद खूप समाधान मिळवून देतात.
- सतीश चव्हाण,
पोलीस कर्मचारी