रेल्वेखाली घसरणाऱ्या वृद्धाला पोलिसांनी वाचविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 12:11 AM2021-04-28T00:11:57+5:302021-04-28T00:39:07+5:30
नाशिक रोड : नाशिक रोड रेल्वे स्थानक प्लॅटफार्म दोनवर गोदान एक्स्प्रेस मुंबईकडे जाण्यासाठी सुरू होताच रेल्वेत चढणाऱ्या वयोवृद्ध प्रवाशाचा हात सटकल्याने ते घसरत असताना गस्तीवर असलेल्या दोघा रेल्वे पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून मदत केल्याने त्यांचे प्राण वाचले. यामुळे मोठी दुर्दैवी घटना टळली.

नाशिक रोड रेल्वे स्थानक प्लॅटफार्म क्रमांक दोनवर उत्तर प्रदेशहून मुंबईला जात असलेली गोदान एक्स्प्रेस सोमवारी सकाळी ११.५० वाजता आली होती. बी वन बोगीतील वयोवृद्ध प्रवासी शेख रियाज अहमद (६७) हे प्लॅटफॉर्मवर उतरून बाटलीमध्ये पिण्याचे पाणी भरत होते. दरम्यान, गोदान एक्स्प्रेस सुरू होऊन मुंबईच्या दिशेने निघू लागताच शेख रियाझ हे पळत जाऊन आपला रेल्वे डबा पकडण्याचा प्रयत्न करू लागले. त्या वेळी त्यांचा हात निसटल्याने ते डब्याच्या व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकले.
ही बाब तेथे गस्त घालणारे रेल्वे पोलीस इम्रान कुरेशी व राकेश शेडमाके यांच्या लक्षात येताच त्यांनी पळत जाऊन डब्यात अर्थवट अडकलेल्या शेख रियाज यांच्या कमरेचा बेल्ट धरून त्यांना प्लॅटफार्मवर ओढून घेतले. त्यामुळे दुर्दैवी घटना टळली. ही बाब रेल्वेतील प्रवाशांच्या लक्षात येताच आरडाओरड झाल्याने गोदान एक्स्प्रेस काही अंतरावर थांबविण्यात आली.
पोलिसांनी शेख रियाझ यांना पुन्हा गोदान एक्स्प्रेसमध्ये बसवून निरोप दिला. रेल्वे पोलिसांनी दाखवलेली तत्परता यामुळे प्रवासी शेख रियाझ यांचे प्राण वाचले. लोहमार्ग पोलीस इम्रान कुरेशी व शेडमाके यांनी प्रवासी शेख यांचा जीव वाचवला म्हणून लोहमार्ग पोलीस ठाण्याचे साहाय्यक निरीक्षक विष्णू भोये, पंढरीनाथ मगर, महिला पोलीस उपनिरीक्षक युगंधारा केंद्रे आदींनी त्यांचे अभिनंदन केले.