धबधबा क्षेत्रात पोलिसांचे निर्बंध कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:11 AM2021-07-02T04:11:08+5:302021-07-02T04:11:08+5:30
घोटी : नाशिक जिल्ह्यातील तसेच नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर इगतपुरी तालुक्यातील पर्यटन ठिकाणे, गड, किल्ले, धरणाचा परिसर, गिर्यारोहकांसाठी सह्याद्रीच्या ...
घोटी : नाशिक जिल्ह्यातील तसेच नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर इगतपुरी तालुक्यातील पर्यटन ठिकाणे, गड, किल्ले, धरणाचा परिसर, गिर्यारोहकांसाठी सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये, धबधब्यांवर अजूनही पोलिसांचे निर्बंध कायम असून पर्यटकांनी पावसाळ्यात खबरदारी म्हणून पर्यटन टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लॉकडाऊननंतर दोन वर्षे घरातच बसून कंटाळा आलेल्या पर्यटकांना इगतपुरीचा परिसर पावसाळ्यात आवडीचे ठिकाण असल्याने धोके वाढले असल्याने सतर्क होण्याची गरज आहे. इगतपुरी तालुक्यासह नगर जिल्ह्यातील भंडारदरा, ठाणे जिल्ह्यातील विहिगाव येथील अशोका फॉल्स, इगतपुरी तालुक्यातील भावली धबधबा, काळूस्ते धरण, भाम धरण, वैतरणा धरण, कसारा घाट अशा विविध ठिकाणी पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणात असतो.
शनिवार, रविवार वीकएंडला ठाणे, मुंबई, नाशिक, नगर जिल्ह्यातील पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असतात. प्रशासकीय पातळीवर या पर्यटनस्थळावर कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून खबरदारी म्हणून या परिसरात पोलिसांनी नाकाबंदी केली असली तरी छुप्या मार्गाने पर्यटक जात असल्याने आणि पर्यटनस्थळावरील धबधबे, धरणस्थळावरील जमीन दलदलीची झाली असल्याने धोके वाढले आहेत.
इगतपुरी तालुका पावसाचे माहेरघर असून महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून प्रचलित आहे. या ठिकाणी तीन महिने पावसाचे प्रमाण खूप जास्त असल्याने या ठिकाणचा परिसर मनमोहक झालेला असतो. हिरवा शालू पांघरलेला परिसर पर्यटकांसाठी पर्वणीच ठरतो, परंतु दोन वर्षांच्या कार्यकाळात या पर्यटनस्थळावर कुठल्याही पर्यटकांची वर्दळ नसल्याने या ठिकाणचे हिंस्र पशू, पक्षी, जलचर प्राणी मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने ही सर्व ठिकाणे धोकादायक झाली आहेत. तलाव, धरणांच्या किनाऱ्यावर पाण्याचा अंदाज येत नसल्याने मोठ्या संकटांना सामोरे जावे लागू शकते. धरणाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने गत दोन वर्षांपासून धरणात गाळ साचलेला असल्याने कित्येक पर्यटकांना दोन महिन्यांपूर्वी जीव गमवावे लागले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून काही दिवस येणाऱ्या पावसाळ्यात पर्यटनस्थळी स्वतःला व कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी पाण्यामध्ये, जंगलात न उतरण्याचा सल्ला वनविभागाचे अधिकारी व गिर्यारोहकांनी दिला आहे.
---------------------
त्र्यंबकेश्वर परिसरात धोक्याच्या सूचना
त्र्यंबकेश्वर परिसरातील व तालुक्यातील दुगारवाडी, ब्रह्मगिरी, लेकुरवाळी, नेकलेस धबधबा, अंबोली घाटातील धबधबा, अंजनेरी येथील उलटे धबधबे, हरसुल परिसरात पाच धबधबे असून दोन्हीकडे जास्त पाऊस झाल्यास लहान-मोठे असंख्य धबधबे उद्भवतात. या धबधब्यांवर पावसाळ्यात एन्जाॅय म्हणून जाऊ नये. याबरोबरच गड, किल्ले आदी स्थळांना जाऊ नये. दुगारवाडी धबधब्याने आतापर्यंत १० ते १५ बळी घेतले आहेत. पोलीस व वनविभागाने तर फलक लावून धोक्याची सूचना दिली आहे. या ठिकाणी जाण्यासाठी संपूर्ण मनाई केली आहे. निषिद्ध क्षेत्र म्हणून ही पर्यटनस्थळे घोषित केली आहेत. शनिवार व रविवार संचारबंदी करण्यात आली आहे.