पोलिसांनी घेतला १११ बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 05:01 PM2020-01-05T17:01:26+5:302020-01-05T17:02:13+5:30
पंचवटी पोलीस ठाण्याच्या आवारात धुळखात असलेल्या वाहनांपैकी १११चारचाकी, रिक्षा, दुचाकी मालकांचा शोध पोलिसांना लागला आहे. यामध्ये ७ रिक्षा, ८ चारचाकी, ९६ दुचाकींचा समावेश आहे.
नाशिक : विविध गुन्ह्यांमध्ये तसेच अपघातांत जमा केलेली वाहने पोलीस ठाण्यांमध्ये वर्षानुवर्षे धुळखात पडून असल्याचे चित्र पहावयास मिळते. वाहनांच्या मुळ मालकांचा शोध घेताना पोलिसांची दमछाक होत असल्याने ‘भंगार’ वाढतच जाते. यामुळे पोलीस ठाणे की जुन्या वाहनांचे गुदाम? असा प्रश्न बघणाऱ्यांनाही पडतो. यामुळे पोलीस आयुक्तांनी ‘पोलीस स्टेशन क्लिनिंग’चे मिशनच जणू हाती घेतले आहे. यासाठी पुण्याच्या एका संस्थेला पाचारण करत भंगार झालेल्या वाहनांमधील बेवारस वाहनांच्या मुळ मालकांचा शोध घेतला जात आहे. सातपूरनंतर पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील तब्बल १११ वाहनांच्या मुळ मालकांपर्यंत पोलिसांना पोेहचता आले.
पोलीस आयुक्तालयातील प्रत्येक पोलीस ठाण्यांच्या आवारात शेकडोंच्या संख्येने बेवारस वाहनांचा खच साचला आहे. या वाहनांचे मालक मिळून येत नसल्याने त्यांची विल्हेवाट लावणे पोलिसांकरिता डोकेदुखी बनली आहे. यामुळे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी याकडे लक्ष देत सर्वच पोलीस ठाण्यांमधील बेवारस वाहनांची शोधमोहीम हाती घेण्याचे आदेश दिले. त्याची सुरूवात सातपूर पोलीस ठाण्यापासून करण्यात आली. यांनतर पंचवटी पोलीस ठाण्यातील बेवारस वाहने पुणे येथील गंगामाता वाहन वाहन शोध पथकाच्या मदतीने पंचवटी पोलिसांनी शोधली. ज्या वाहनांचे मुळ मालक मिळून आले आहे, त्यांची वाहने त्यांच्याकडे सुपुर्द केले जातील. त्या मालकांशी याबाबत संपर्क साधला जात आहे. पंचवटी पोलीस ठाण्याच्या आवारात धुळखात असलेल्या वाहनांपैकी १११चारचाकी, रिक्षा, दुचाकी मालकांचा शोध पोलिसांना लागला आहे. यामध्ये ७ रिक्षा, ८ चारचाकी, ९६ दुचाकींचा समावेश आहे.