जिल्हा रुग्णालयात पोलीस बंदोबस्त!
By admin | Published: March 25, 2017 12:56 AM2017-03-25T00:56:28+5:302017-03-25T00:56:41+5:30
नाशिक : खासगी वा सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांवर हल्ले रोखण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयाने पुढाकार घेतला आहे़ शहरातील सरकारी रुग्णालयांमध्ये पोलीस गार्डची नेमणूक करण्यात आली
नाशिक : खासगी वा सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांवर हल्ले रोखण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयाने पुढाकार घेतला आहे़ शहरातील सरकारी रुग्णालयांमध्ये पोलीस गार्डची नेमणूक करण्यात आली असून, बीट मार्शलला दर दोन तासांनी रुग्णालयामध्ये जाऊन भेट देण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ याबरोबरच खासगी रुग्णालयांमधील डॉक्टरांना आयएमएच्या बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांचे फोन नंबर देण्यात आले असून, अनुचित घटनेची जाणीव होताच फोन केल्यास त्वरित पोलीस बंदोबस्त दिला जाणार आहे़ डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारी व खासगी डॉक्टरांनी संप पुकारला होता़ यामुळे रुग्णांचे मोठ्या संख्येने हाल झाले तर आयएमएच्या वतीने शहरात डॉक्टरांनी मोर्चाही काढला़ या मोर्चानंतर आयएमएच्या पदाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, डॉ़ राजू भुजबळ यांनी खासगी डॉक्टरांना सुरक्षेबाबत आश्वस्त केले़ तसेच दोन दिवसांपूर्वी द्वारकाजवळील एका नामांकित रुग्णालयात एका रुग्णाच्या मृत्यूनंतर झालेली घटना रोखण्यात पोलिसांना यश आल्याचे सांगितले़ पोलीस उपआयुक्त पाटील व सहायक पोलीस आयुक्त भुजबळ यांनी रात्री आठ वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात भेट दिली़ जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ सुरेश जगदाळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ गजानन होले यांची भेट देऊन डॉक्टरांच्या सुरक्षेची हमी दिली़ सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ़ सीताराम कोल्हे यांनी रुग्णालयातील पोलीस चौकीमध्ये एक रजिस्टर ठेवले असून, बीट मार्शलला या ठिकाणी नोंद करावी लागणार आहे़ (प्रतिनिधी)