अदखलपात्र गुन्ह्यांच्या सोडवणुकीसाठी पोलिसांचा बहुतांशी वेळ खर्ची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 06:55 PM2018-10-07T18:55:55+5:302018-10-07T18:58:19+5:30
पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलेला किरकोळ स्वरूपातील वाद हा प्राथमिक अवस्थेतच मिटविला जावा, त्याचे रूपांतर गंभीर गुन्ह्यात होऊ नये यासाठी पोलिसांकडून अदखलपात्र गुन्हा नोंदविला जातो़ तक्रारदार व आरोपी या दोघांमध्ये पोलीस आपसी समझोता घडवून वाद मिटविण्याचा प्रयत्न करतात़ मात्र, तरीही वाद मिटला नाही तर चॅप्टर केस करून सहायक पोलीस आयुक्तांकडे पाठविला जातो़ सद्यस्थितीत शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्ह्यांची संख्या वाढत चालली असून, पोलिसांचा बहुतांशी वेळ हा या गुन्ह्यांच्या सोडवणुकीसाठी खर्ची पडत असल्याचे चित्र आहे़
संजय शहाणे, इंदिरानगर
पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलेला किरकोळ स्वरूपातील वाद हा प्राथमिक अवस्थेतच मिटविला जावा, त्याचे रूपांतर गंभीर गुन्ह्यात होऊ नये यासाठी पोलिसांकडून अदखलपात्र गुन्हा नोंदविला जातो़ तक्रारदार व आरोपी या दोघांमध्ये पोलीस आपसी समझोता घडवून वाद मिटविण्याचा प्रयत्न करतात़ मात्र, तरीही वाद मिटला नाही तर चॅप्टर केस करून सहायक पोलीस आयुक्तांकडे पाठविला जातो़ सद्यस्थितीत शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्ह्यांची संख्या वाढत चालली असून, पोलिसांचा बहुतांशी वेळ हा या गुन्ह्यांच्या सोडवणुकीसाठी खर्ची पडत असल्याचे चित्र आहे़
शहराच्या लोकसंख्येचा विचार करता पोलिसांचे बळ तुलनेने कमी आहे़ इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत सुमारे अडीच ते तीन लाख लोकसंख्या आहे़ या परिसरातील वाढती चेनस्रॅचिंग, घरफोड्या, लूट या घटनांना अटकाव करताना पोलीस मेटाकुटीस आले आहेत़ सोसायटी व परिसरातील किरकोळ स्वरूपातील भांडणांच्या किमान पाच ते सात अदखलपात्र गुन्हे प्रतिदिन पोलिसांत नोंदविले जातात़ त्यामध्ये लहान मुलांची भांडणे, गल्लीबोळात खेळत असताना होणाऱ्या हाणामाºया, सोसायटीतील महिलांची भांडणे यांचे प्रमाण अधिक आहे़
पोलीस ठाणे म्हटले की, गुन्हे व गुन्हेगार हे आलेच. मात्र या व्यतिरिक्त मोठ्या संख्येने दाखल होणारे अदखलपात्र गुन्हे पोलिसांची डोकेदुखी ठरत आहेत़ रस्त्याने जाताना माझ्याकडे रागाने का बघितले, माझ्या दरवाजासमोर चप्पल का काढता, कचरा आमच्या भागात का लावतात, आमच्या हद्दीत कपडे का वाळत घालतात, वाहने का लावतात, फुले का तोडतात यांसारख्या तक्रारी पोलीस ठाण्यात येत आहेत़ काही तक्रारींबाबत तर काय निर्णय द्यावा, असा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहतो़ या किरकोळ तक्रारींकडे दुर्लक्ष करावे तर भविष्यात गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते अन् कायद्यात कडक कारवाईची तरतूद नाही़
पोलीस अदखलपात्र गुन्ह्यांमधील दोघांमध्येही समझोता करण्यासाठी प्रयत्न करतात, मात्र ब-याचदा प्रतिसाद मिळत नाही, अशावेळी पोलिसांना आपला खाक्या वा कायद्याची भीती दाखवून दोघांनाही शांत करावे लागते़ शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील अदखलपात्र गुन्ह्यांबाबत परिस्थिती समान आहे़ विशेष म्हणजे अशिक्षित नागरिकांबाबत समजून घेता येऊ शकते, मात्र तक्रारींमध्ये सुशिक्षित नागरिकांचीच संख्या अधिक आहे़ त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी आणखीच वाढत आहे़
पोलीस ठाण्यात दाखल होणारे दखलपात्र गुन्हे (अंदाजे)
* प्रत्येक पोलीस ठाण्यात प्रतिदिन सुमारे - ५ गुन्हे
* शहरातील १४ पोलीस ठाण्यात प्रतिदिन - ७० गुन्हे
* महिनाभरात सर्व पोलीस ठाण्यांमध्ये - २१००
* वर्षभरात अदखलपात्र गुन्ह्यांची संख्या - २५ हजार २००
अदखलपात्र गुन्ह्यांमधील कारणे
* सोसायटीमधील भांडणे
* मुलांच्या खेळण्यावरून होणारी भांडणे
* माझ्या दरवाजासमोर चप्पल का काढली
* कचरा नेहमी आमच्या दरवाजाकडे ढकलता जातो
* घरासमोर गाडी लावली
* घरासमोरील झाडाची फुले, फळे तोडली
* किरकोळ कारणे
भविष्यातील गंभीर प्रकार टाळण्यास मदत
पोलीस ठाण्यात भांडण किंवा वादाची तक्रार करण्यासाठी येणाºया नागरिकांकडून केल्या जाणाºया तक्रारीचे स्वरूप पाहून अदखलपात्र वा गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाते़ भांडण किंवा वाद हा समझोत्याने मिटला जाऊ शकत असेल तर अदखलपात्र गुन्हा नोंदवून घेऊन दोघांमध्ये समेट घडवून आणला जातो़ अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद व कारवाई यामुळे भविष्यातील मोठा गुन्हा टळल्यास मदत होते़
गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय
शेजा-यांशी भांडण, रागाने पाहणे, कचरा टाकणे, अपार्टमेंट वा सोसायटीचा देखभाल खर्च न देणे आदी प्रकारचे वाद पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यातील गंभीरता ओळखून प्रारंभी अदखलपात्र गुन्हा नोंदवून घेतला जातो़ यानंतर तक्रारकर्ता व आरोपी या दोघांचे भांडण मिटवून समझोता घालण्याचा प्रयत्न केला जातो़ मात्र, दोघेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतील तर संबंधितांवर चॅप्टर केस दाखल करून सहायक पोलीस आयुक्तांकडे पाठविले जाते़ अदखलपात्र गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे़
- नारायण न्याहाळदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, इंदिरानगर