‘इसिस’मध्ये जा...’ असे वक्तव्य करणा-या शिया बोर्डाचे रिझवी यांच्याविरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 02:36 PM2018-02-08T14:36:19+5:302018-02-08T14:42:14+5:30
अयोध्येमध्ये शुक्रवारी रिझवी यांनी एका भाषणाद्वारे थेट देशद्रोही प्रकारचे वक्तव्य करीत देशातील मुस्लीमांची दिशाभूल तर केलीच मात्र देशाच्या सुरक्षेलाही छेद देण्याचा प्रयत्न करत दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याचे निवेदनात म्हटले आहे.
नाशिक : शिया मध्यवर्ती वक्फ मंडळाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी देशातील तरुणांना भडकविणारे वक्तव्य करत थेट बगदादीच्या इसिस या दहशतवादी संघटनेत सामील व्हा, असे अयोध्येत गेल्या शुक्रवारी म्हटले होते. या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी व भद्रकाली पोलीस ठाण्यात कायदेशीर कारवाईची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
अयोध्येमध्ये शुक्रवारी रिझवी यांनी एका भाषणाद्वारे थेट देशद्रोही प्रकारचे वक्तव्य करीत देशातील मुस्लीमांची दिशाभूल तर केलीच मात्र देशाच्या सुरक्षेलाही छेद देण्याचा प्रयत्न करत दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याचे निवेदनात म्हटले आहे. रिजवी यांनी त्यांच्या वक्तव्यातून मुस्लीमांना थेट अबुबकर अल बगदादी याच्या इसिस या दहशतवादी संघटनेत सामिल व्हा, असे म्हटले होते. भारत सरकारने त्यांच्या त्या भाषणाची ध्वनिफित तपासून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी व भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मंगलसिंह सुर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तसेच मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीने याप्रकरणी भद्रकाली पोलिसांना तक्रार अर्जही दिला आहे. तसेच रिजवी यांचे वक्तव्य हे त्यांच्या इसिस संघटनेशी लागेबांधे असल्याचा संशय निर्माण करणारे असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तक्रारअर्जावर अध्यक्ष अजीज पठाण यांची स्वाक्षरी आहे.