पोलीस रस्त्यांवर, नागरिक घरात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:14 AM2021-05-13T04:14:13+5:302021-05-13T04:14:13+5:30
सिन्नर : कोरोना प्रतिबंधासाठी लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांची बुधवारी (दि. १२) दुपारी १२ वाजेपासून कडक अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळे ...
सिन्नर : कोरोना प्रतिबंधासाठी लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांची बुधवारी (दि. १२) दुपारी १२ वाजेपासून कडक अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत असून, नाकाबंदीसाठी पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. आंतरजिल्हा सीमांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे.
ग्रामीण भागातही नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाणार असल्याची माहिती सिन्नरच्या उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे यांनी दिली.
बुधवारी दुपारी १२ वाजेनंतर जीवनावश्यक वस्तूंचे शटर डाऊन करण्यात आले. त्यानंतर रस्त्यावर शुकशुकाट निर्माण झाला. पोलीस, महसूल, पंचायत समिती, नगर परिषद व संबंधित अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर उतरून अॅक्शन मोडमध्ये आले. रस्त्यावर वैद्यकीय कारणाव्यतिरिक्त फिरणाऱ्या नागरिकांना समज देण्यात आली. त्यानंतर आढळून येणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, नाशिक-पुणे व सिन्नर-शिर्डी महामार्गावर असलेल्या आंतरजिल्हा सीमा कडक करण्यात आल्याची माहिती वावी पोलीस ठाण्याचे साहाय्यक निरीक्षक सागर कोते यांनी दिली. नाशिक जिल्ह्यातून पुणे व अहमदनगर जिल्ह्यात ये-जा करणाऱ्या वाहनांची कडक तपासणी करण्यात येत आहे.
सिन्नर शहरात पोलीस व नगर परिषदेचे संयुक्त पथक फिरून कारवाईसाठी सज्ज झाल्याचे दिसून आले. तर ग्रामीण भागात पंचायत समितीचे नोडल अधिकारी फिरून ग्रामस्तरीय समितीवर लक्ष ठेवून कारवाई करणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. त्यासंबंधी पोलिसांना तशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
--------------------
पेट्रोल पंप मालकांना सूचना
सिन्नर शहरासह ग्रामीण भागातील पेट्रोल पंप चालकांना नोडल अधिकाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष पेट्रोल पंपावर जाऊन लेखी सूचनांचे पत्र देण्यात आले. मालवाहतूक वाहने, रुग्णवाहिका, शासकीय वाहने व अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांना पेट्रोल किंवा डिझेल देण्यात येणार आहे. अन्य कोणत्याही नागरिकांना कारणाशिवाय पेट्रोल व डिझेल देण्यात येऊ नये, अशा सूचना करण्यात आल्या. तसे आढळून आल्यास सुरुवातीला १० हजार रुपये दंड आणि दुसऱ्यांदा आढळून आल्यास पेट्रोल पंप सील करण्यात येणार आहे. पेट्रोल आणि डिझेल देताना शासनाच्या नियमानुसार वाहनांचा नंबर, नाव व शासनाने दिलेल्या विहित नमुन्यातील माहिती भरून घेतली जाणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र पाहिले जाणार आहे.
---------------
घरपोहोच किराणासाठी अटी
सकाळी ७ ते १२ या वेळेत किराणा, मिठाई, बेकरी व दूध या आस्थापनांमधून घरपोहोच सेवा सुरू राहणार आहे. मात्र त्यासाठी डिलिव्हरी बॉयची रॅपिड टेस्ट करणे बंधनकारक आहे. त्याच्याकडे दुकानाचे ओळखपत्र व बिल असणे गरजेचे आहे. सदर घरपोहोच सेवा दुपारी १२ वाजेपर्यंतच देता येणार आहे. ग्राहक दुकानात आढळून आल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
--------------
बॅँकांनाही १२ वाजेची वेळ
बॅँकांनाही आर्थिक व्यवहारासाठी दुपारी १२ वाजेची वेळ देण्यात आली आहे. त्याचबरोबर एटीएमसाठीही १२ वाजेपर्यंत वेळ असणार आहे. त्यानंतर आर्थिक व्यवहारासाठी कडक निर्बंध असणार आहेत. अंत्यसंस्कारासाठी २० व्यक्ती असणार आहेत. विवाह नोंदणी कार्यालयात पाच लोकांना विवाहासाठी जाता येईल. घरगुती विवाह पूर्णपणे बंद असणार असून, आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड यांनी दिली.
-----------
प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक
सिन्नर तहसील कार्यालयात पंचायत समिती, महसूल, पोलीस, नगर परिषद या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. त्यात उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे यांनी अधिकाऱ्यांना सूचना करत कडक लॉकडाऊनची माहिती दिली. या वेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, सिन्नरचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्यासह सर्वच विभागांचे अधिकारी उपस्थित होते.