पोलीस उपनिरीक्षकाची पुण्यात रेल्वेखाली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 01:25 AM2018-11-28T01:25:54+5:302018-11-28T01:26:25+5:30
आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर व्हायरल करण्याची धमकी देऊन गत साडेतीन वर्षांपासून मुंबईच्या अंबोली पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक साजन सानप (रा. मंजुळा मंगल कार्यालयामागे, नाशिकरोड) हा बलात्कार करीत असल्याची फिर्याद जेलरोड परिसरातील शिक्षिका तसेच शहरातील एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने उपनगर पोलीस ठाण्यात दिली आहे़
नाशिकरोड : आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर व्हायरल करण्याची धमकी देऊन गत साडेतीन वर्षांपासून मुंबईच्या अंबोली पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक साजन सानप (रा. मंजुळा मंगल कार्यालयामागे, नाशिकरोड) हा बलात्कार करीत असल्याची फिर्याद जेलरोड परिसरातील शिक्षिका तसेच शहरातील एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने उपनगर पोलीस ठाण्यात दिली आहे़ याप्रकरणी उपनगर पोलिसांनी संशयित उपनिरीक्षक सानपविरोधात विनयभंग, बलात्कार तसेच जातिवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़
दरम्यान, पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर सानप याने पुण्यात रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि़ २७)
घडली आहे़
उपनगर पोलीस ठाण्यात पीडित शिक्षिकेने दिलेल्या फिर्यादीनुसार या महिलेचा पती मुंबईत पोलीस दलात असताना संशयित साजन सानपही तिथे नियुक्तीस होता. पीडित महिला व सानप हे जेलरोड परिसरातच राहत असल्याने पतीमुळे या दोघांची ओळख झाली. एप्रिल २०१४ मध्ये घरात स्वयंपाक करताना महिला जखमी झाल्याने तिला पाहण्यासाठी सानप तिच्या घरी आला होता़ यानंतर दोघांचे फोनवर बोलणे सुरू झाले होते, त्यातच काही कारणावरून सानपने महिलेला तिच्या पतीविरुद्ध भडकविण्याचा प्रयत्न केला. तसेच पतिविरुद्ध पुरावा देण्याच्या बहाण्याने त्याने या महिलेशी जवळीक साधली. माझ्या मनासारखी वागली नाहीस तर फेसबुकवर फोटो अपलोड करण्याची धमकी दिली़ साडेतीन वर्षे अशाप्रकारे त्याने या महिलेवर अत्याचार केले. याप्रकरणी महिलेने पतीसोबत उपनगर पोलीस ठाणे गाठून सोमवारी (दि़२६) फिर्याद दिली़
उपनगर पोलीस ठाण्यात बलात्कार तसेच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला पोलीस उपनिरीक्षक साजन सानप (३७) याने मंगळवारी (दि़ २७) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली़ मुंबईतील आंबोली पोलीस ठाण्यात कार्यरत साजन सानप हे पुण्याहून शिवाजीनगरकडे जात असताना अचानक रेल्वेसमोर जाऊन उभे राहिले. यामध्ये रेल्वेची जोरदार धडक बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, ही आत्महत्या नसून अपघात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, याप्रकरणी पुणे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़