सात चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2022 01:41 AM2022-03-26T01:41:17+5:302022-03-26T01:41:46+5:30
वेगवेगळ्या टोळ्यांच्या सात चोरट्यांकडून ९ मोटारसायकली, १९ मोबाईल व आठ ग्रॅमची सोन्याची पोत असा एकूण साडेतीन लाखांचा ऐवज जप्त केला असून, नाशिकरोडसह शहरात दुचाकी व मोबाईल चोरून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरविणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात नाशिकरोड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला यश आले आहे.
नाशिकरोड : वेगवेगळ्या टोळ्यांच्या सात चोरट्यांकडून ९ मोटारसायकली, १९ मोबाईल व आठ ग्रॅमची सोन्याची पोत असा एकूण साडेतीन लाखांचा ऐवज जप्त केला असून, नाशिकरोडसह शहरात दुचाकी व मोबाईल चोरून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरविणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात नाशिकरोड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला यश आले आहे.
एकलहरा रोड भागात निर्मल अपार्टमेंट मधून आठ दिवसांपूर्वी एकाच रात्री ३ मोटारसायकली चोरीस गेल्या होत्या. तसेच गेल्या काही दिवसांपासून नाशिकरोड व उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. नाशिकरोड गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी दुचाकी चोरट्यांचा शोध घेत असताना पोलीस नाईक विशाल पाटील यांना एकलहरा रोडवरील निर्मल अपार्टमेंटमधून चोरीस गेलेल्या दुचाकी विकण्यासाठी सिन्नरफाटा भागात संबंधित चोरटे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सिन्नरफाटा भागात साध्या वेशात सापळा रचला. यावेळी चौघेजण दोन दुचाकी घेऊन सिन्नरफाटा परिसरात संशयास्पदरित्या आल्याचे लक्षात येताच पोलिसांनी प्रदीप ऊर्फ गणेश विठ्ठल काळे (रा. आडकेनगर, जय भवानी रोड), यज्ञेश ऊर्फ मॅडी ज्ञानेश्वर शिंदे (रा.म्हसोबा मंदिराजवळ देवळालीगाव), अमन सूरज वर्मा (रा. जयभवानी रोड), अक्षय ऊर्फ आर्या राजेश धामणे (रा. भालेराव मळा जयभवानी रोड) या चौघांच्या मुसक्या आवळत त्यांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी चौघांचीही कसून चौकशी केली. त्यात त्यांनी एकलहरा रोडवरील निर्मल अपार्टमेंटमधून तीन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. या तीनही दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या असून, संशयित अमन वर्मा याच्याकडून चोरी केलेेले विविध कंपन्यांचे तब्बल १९ मोबाईल जप्त करण्यात आले. याशिवाय पोलिसांनी संशयित आप्पा सदाशिव धिवरे (रा. पळसे) व साजिद शेख या दोघांकडून चोरीच्या दोन दुचाकी अशा एकूण नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, एका विधीसंघर्षीत बालकाने शुभम ऊर्फ बाशी हरबीन बेहनवाल याच्या मदतीने जेलरोड कोठारी कन्या शाळेजवळ महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून आठ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.