नोटा गहाळप्रकरणी पोलिसांनी घेतले जाबजबाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:12 AM2021-07-16T04:12:32+5:302021-07-16T04:12:32+5:30
नाशिक रोड : जेल रोड येथील चलार्थपत्र मुद्रणालयातील पाच लाख रुपयांची रोकड चोरीस गेल्याप्रकरणी उपनगर पोलिसांनी गुरुवारी दिवसभर ...
नाशिक रोड : जेल रोड येथील चलार्थपत्र मुद्रणालयातील पाच लाख रुपयांची रोकड चोरीस गेल्याप्रकरणी उपनगर पोलिसांनी गुरुवारी दिवसभर अधिकारी व कामगार यांचे जबाब घेऊन सविस्तर माहिती जाणून घेतली. विविध दराच्या नोटा छपाई करणाऱ्या जेल रोड येथील चलार्थपत्र मुद्रणालयातून फेब्रुवारी महिन्यात पाचशे रुपये दराच्या १ हजार नोटा म्हणजेच ५ लाख रुपये घाळ झाले होते. सदर बाब प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर दोन सदस्यीय समिती नेमून गेल्या सहा महिन्यांपासून चौकशी करण्यात येत होती. मात्र, घाळ झालेल्या किंवा हरवलेल्या पाच लाख रुपयांच्या रोकडबाबत कुठलीच निश्चित माहिती निष्पन्न होत नसल्याने दोन दिवसांपूर्वी उपनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर बुधवारी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुद्रणालयात भेट देऊन कामाची प्रचलित पद्धत जाणून घेत अधिकारी व कामगारांची चर्चा करून माहिती घेतली. मुद्रणालयात येताना व जाताना कामगारांची होणारी तपासणी, सुरक्षेचे नियोजन व सर्व परिस्थिती समजून घेत पोलिसांनी नोटा छपाई झाल्यानंतर त्यांची पॅकिंग होईपर्यंत सर्व माहिती समजून घेतली. तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक संतोष खडके व कर्मचाऱ्यांनी गुरुवारी दिवसभर मुद्रणालयात अधिकारी व कर्मचारी यांच्याशी चर्चा करून त्यांचे जबाब नोंदवून घेतले.
नोटा छपाई झाल्यानंतर प्रचलित पद्धतीनुसार जोपर्यंत सर्व नोंद पूर्ण आहे; परंतु विशिष्ट टेबलाकडून पुढच्या टेबलाकडे नोटांचे बंडल जाताना नोटा गहाळ झाल्याचे किंवा चोरीस गेल्याचे निष्पन्न होत आहे. त्या विभागातील सर्व अधिकारी व कामगार यांची पोलिसांकडून विचारपूस चालू असून जबाब नोंदवून घेतले जात आहेत. केंद्र शासनाचे आयबी, इंटेलिजन्स यांचे देखील अधिकारी, कर्मचारी तेथे असूनही पाच लाखांची रोकड चोरीला गेल्याने याची गंभीर दखल पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आली आहे.
दिल्लीच्या वरिष्ठ स्तरावरून गुन्हा दाखल झाल्यानंतर होत असलेल्या प्रक्रियेची सविस्तर माहिती घेतली जात आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची सुरक्षा यंत्रणा, लाॅकडाऊनमुळे फेब्रुवारी महिन्यात बंद असलेले विभाग, कंत्राटी कामगार अशा वेगवेगळ्या पातळीवरून पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. त्याबाबत माजी कामगार नेते व अनेक माजी कामगार यांनी ९९ मुद्रणालयातून चोरी होऊ शकत नाही, कामगार असे करणार नाहीत हे अत्यंत विश्वासाने व छातीठोकपणे सांगत आहेत. ते छापलेल्या नोटाचे पाकीट कुठेतरी मिस प्लेस झाले असेल, आज ना उद्या ते सापडेल, असे विश्वासाने माजी कामगार संगत आहेत. मात्र, प्रशासनाचा हलगर्जीपणा हादेखील याला कारणीभूत असल्याचे माजी कामगार सांगत आहेत.