कसबे सुकेणेत पोलिसांचा कडक बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 11:18 PM2020-03-25T23:18:08+5:302020-03-25T23:18:46+5:30
कोरोनाला रोखण्यासाठी खबरदारी म्हणून जाहीर केलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी अरुंधती राणे यांनी कसबे सुकेणे शहर व मौजे सुकेणे येथे नाकाबंदीच केली आहे. तसेच जनतेला घरीच राहण्याचे आवाहन केले.
कसबे सुकेणे : कोरोनाला रोखण्यासाठी खबरदारी म्हणून जाहीर केलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी अरुंधती राणे यांनी कसबे सुकेणे शहर व मौजे सुकेणे येथे नाकाबंदीच केली आहे. तसेच जनतेला घरीच राहण्याचे आवाहन केले.
कसबे सुकेणे शहर व मौजे सुकेणे येथील कोरोना खबरदारी संचारबंदी व नाकाबंदीचा आढावा राणे यांच्यासह राजेश पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी घेतला. कसबे सुकेणे शहरातील मेनरोड, बाजारपेठ, बसस्थानक, छत्रपती शिवाजी चौक, केआरटी रोड, मौजे सुकेणे गाव व हजारो भाविकांचे श्रद्धास्थान दत्त मंदिर या परिसराची पाहणी करून नाकेबंदीच्या सूचना केल्या. यात्राकाळामध्ये सुस्तावलेल्या कसबे सुकेणे प्राथमिक आरोग्य केंद्राला कोरोनामुळे खडबडून जाग आली. जिल्हा परिषद सदस्य दीपक शिरसाठ, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव पाटील यांनी बैठक घेत आरोग्य कर्मचाऱ्यांना सूचना केल्या.
कसबे सुकेणे येथे आतापर्यंत इंग्लंड, सुदान, अंदमान निकोबार व दुबई येथून चार व्यक्ती आल्या आहेत. या सर्वांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असले तरी त्यांना १४ दिवस एकांतात राहण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत.
त्यांची वेळोवेळी पाहणी केली जात असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव पाटील यांनी सांगितले.