संचारबंदी अंमलबजावणीसाठी पोलीस आले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:14 AM2021-04-15T04:14:41+5:302021-04-15T04:14:41+5:30
----- लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : राज्यात बुधवारी(दि.१८) रात्री आठ वाजेपासून संचारबंदी अंमलात आणण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर आलेला दिसून ...
-----
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : राज्यात बुधवारी(दि.१८) रात्री आठ वाजेपासून संचारबंदी अंमलात आणण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर आलेला दिसून आला. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येऊन विनाकारण वाहने घेऊन फिरणाऱ्यांची चौकशी करण्यात येत होती.
शहर व परिसरात नागरिकांनी दिवस-रात्र अत्यावश्यक कारणांव्यतिरिक्त घराबाहेर न पडण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. बुधवारी रात्रीपासून हे आदेश लागू झाले आहेत. शहरात या आदेशाचे पालन करण्यासाठी पोलीस रस्त्यावर आल्याचे चित्र रात्री बघावयास मिळाले.
कठोर निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करत कोरोनाची साखळी खिळखिळी करण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. यासोबतच नागरिकांनीसुद्धा महत्त्वाची भूमिका बजावत संचारबंदी आदेशाचे पालन करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी केले आहे.
रात्री आठ वाजताच शहरात सर्वच दुकानांचे शटर डाऊन अन् रस्ते सामसूम झाले होते. केवळ मेडिकल आणि दवाखाने रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे दिसून आले.
शासनाने जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीला सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत अशी परवानगी दिली आहे.
सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी रात्री आठ वाजेपासून गस्त वाढवून संचारबंदीची उद्घोषणा करत नागरिकांना घारबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांना अत्यावश्यक कारणांव्यतिरिक्त घराबाहेर पडण्यास परवानगी नसल्याचे पोलिसांकडून गल्लीबोळात गस्त करून उद्घोषणेद्वारे सांगितले जात होते. त्यामुळे शहर व परिसरात रात्री आठचा ठोका पडताच पोलीस वाहनांचा सायरन घुमू लागला होता.
त्यामुळे नागरिकांनीदेखील घराबाहेर पडणे टाळले.