अर्धनग्न आंदोलनप्रश्नी भावे यांना पोलिसांची समज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:15 AM2021-05-27T04:15:38+5:302021-05-27T04:15:38+5:30

नाशिक : येथील एका खासगी रुग्णालयात अर्धनग्न आंदोलन करणारे जितेंद्र भावे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मुंबईनाका पोलीस ठाण्यासमोर घोषणाबाजी ...

Police understand Bhave's half-naked agitation | अर्धनग्न आंदोलनप्रश्नी भावे यांना पोलिसांची समज

अर्धनग्न आंदोलनप्रश्नी भावे यांना पोलिसांची समज

Next

नाशिक : येथील एका खासगी रुग्णालयात अर्धनग्न आंदोलन करणारे जितेंद्र भावे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मुंबईनाका पोलीस ठाण्यासमोर घोषणाबाजी व ठिय्या आंदोलन करत गर्दी करणाऱ्या महिला, पुरुषांविरुद्ध संचारबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी तसेच पोलिसांच्या कायदेशीर कारवाईमध्ये अडथळा आणल्याप्रकरणी भारतीय दंड विधानाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच भावे यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात येऊन त्यांना कडक शब्दांत पोलिसांनी लेखी समजपत्र दिले आहे.

कोरोनाबधित रुग्णावर उपचार करण्यापूर्वी अनामत म्हणून दीड लाख रुपयांची रक्कम भरण्यास एका खासगी रुग्णालयाने सिन्नरच्या अमोल जाधव नामक युवकाला भाग पाडले होते. अमोल यांनी भावे यांच्याशी संपर्क साधून घडलेला प्रकार कथन केला. यानंतर त्यांनी अमोलला सोबत घेत ते रुग्णालय गाठले आणि मंगळवारी तेथे या दोघांनी आपल्या अंगावरील कपडे उतरवून टाकत अर्धनग्न होत आंदोलन केले. हे आंदोलन फेसबुकवरून लाइव्ह करण्यात आले. यानंतर भावे यांना पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले. पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने जमाव जमला आणि भावे यांना त्वरित सोडण्याच्या मागणीसाठी घोषणाबाजी सुरू झाली. अखेर दंगल नियंत्रण पथकाला पोलिसांनी पाचारण केले. यानंतर जमाव पांगला.

दरम्यान, पोलिसांनी संशयित दीनानाथ चौधरी, शुभम खैरनार, अक्षरा घोडके, राम वाघ, सोमनाथ कुराडे, प्रिया विद्याधर कोठावदे, शशिकांत शालीग्राम चौधरी, भाग्यश्री हेमंत गहाळे, रवींद्र धनक, योगेश कापसे, संजय रॉय, विनायक येवले, संदीप शिरसाठ, सागर प्रफुल्ल कुलकर्णी यांच्यासह अन्य २० ते २५ अनोळखी इसमाविरुद्ध संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केले. पोलीसांच्या कायदेशीर कारवाईस अटकाव करून, सायंकाळी चार तास बेकायदेशीरपणे विनापरवाना मुंबई नाका पोलीस ठाण्यात येऊन गैरकायद्याची मंडळी जमवून घोषणाबाजी केली आणि सार्वजनिक शांततेचा भंग केला. यावेळी त्यांना जमाव बेकायदेशीर असल्याची समज देत तेथून निघून जाण्याचे सांगण्यात येत होते तरीदेखील कायदेशीर आदेशाचा भंग करून, पोलिसांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. गैरकायद्याची मंडळी जमवून घोषणाबाजी केली, सार्वजनिक शांततेचा भंग केला म्हणून त्यांच्याविरुध्द मुंबई नाका पोलीस ठाणे भारतीय दंड संहिता कलम १४३, १४५, १४९, १८८, २६९, २७०, ५०४ सह आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम २००५ चे कलम ५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक, चंद्रकांत अहिरे हे करत आहेत.

-----इन्फो------

भावे, अमोल यांच्याविरुद्ध एन. सी. दाखल

रुग्णालयात अंगावरील कपडे काढून गोंधळ घातल्याप्रकरणी संशयित अमोल भाऊसेठ जाधव व जितेंद्र नरेश भावे यांना पोलिसांनी समजपत्र देत कलम १८८, सह आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११०, ११२, ११७ प्रमाणे पोलीस एनसी दाखल करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे त्यांना यापुढे कोणत्याही हॉस्पिटलमध्ये बिलासंबंधित तक्रार असल्यास त्याबाबत जवळच्या पोलीस ठाण्यात येत प्रथम तक्रार दाखल करण्याबाबतही समज देण्यात आली आहे. तसेच वोक्हार्ट रुग्णालयाच्या प्रशासनाला अमोल भाऊसेठ जाधव यांच्याकडून डिपॉझिट स्वरूपात घेतलेली रक्कम परत करण्याबाबतसुद्धा पोलिसांनी समज दिली आहे.

Web Title: Police understand Bhave's half-naked agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.