अपघातग्रस्तांना मदतीसाठी गेलेल्या पोलीस वाहनाला धडक
By admin | Published: June 23, 2017 06:52 PM2017-06-23T18:52:44+5:302017-06-23T18:52:44+5:30
अंबडचे सहायक पोलीस निरीक्षकासह दोन कर्मचारी जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
सिडको : मुबई-आग्रा महामार्गावरील राणेनगर स्टेट बँक चौफुली येथील उड्डाणपुलावर आज पहाटेच्या सुमारास एका कारने दुसऱ्या कारला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्यांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी गेलेल्या अंबडच्या पोलीस वाहनालाही ट्रकने जोरदार धडक दिली. यात सहायक पोलीस निरीक्षक संतोष खडके यांच्यासह दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे. अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास राणेनगर उड्डाण पुलावरुन रवींद्रकुमार पंचाळ (रा.नवा नरोडा. जिल्हा अहमदाबाद) हे त्यांची कार (क्र. ०१-आरएल-७८८१) ने जात असताना त्यांच्या कारला दुसऱ्या कारने जोरदार धडक दिल्याने पंचाळ यांची कार पल्टी होऊन लांबपर्यंत घसरत गेली. यामुळे कारमध्ये असलेल्या पंचाळ याच्या पत्नीस हाता-पायास दुखापत झाली व कारचेही नुकसान झाले. याबाबतची माहिती अबंड पोलिसांना कळताच रात्रपाळी तील सहायक पोलीस निरीक्षक संतोष खडके व पोलीस कर्मचारी हे पोलीस वाहनात अपघाताच्या ठिकाणी जखमींना मदत करण्यासाठी उड्डाणपुलावर पोेहचले. यानंतर जखमींना उपचार करण्यासाठी दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी पोलीस वाहनात बसवत होते. याच दरम्यान पाथर्डी फाट्याकडून भरगाव वेगाने येणाऱ्या ट्रक (क्र.०५ एएम-७७२७) हिचे वरील चालक रमेश गोरडे याने पाठीमागून येऊन जोरात ठोस मारल्याने सहायक पोलीस निरीक्षक संतोष खडके, पोलीस कर्मचारी दिलीप भदाने व फूलमाळी तसेच कारमधील कीर्ती कनोजिया (२६, रा.नाशिक), प्रथमेश गायधनी (२५, रा. नाशिक) व दोन्ही कर्मचारी जखमी झाले आहे. अंबड पोलिसांनी ट्रकसह चालक रमेश गोरडे यास अटक केली असून, त्याच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.