संवेदनशील भागावर पोलिसांचा ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 01:21 AM2019-09-03T01:21:38+5:302019-09-03T01:22:05+5:30
शहर व परिसरात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू झाला असून, सोमवारी (दि.२) शहरात घरोघरी लाडक्या बाप्पांचे आगमन झाले. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था टिकून रहावी, यासाठी आयुक्तालयातील संवेदनशील भागावर पोलिसांचा विशेष ‘वॉच’ आहे.
नाशिक : शहर व परिसरात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू झाला असून, सोमवारी (दि.२) शहरात घरोघरी लाडक्या बाप्पांचे आगमन झाले. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था टिकून रहावी, यासाठी आयुक्तालयातील संवेदनशील भागावर पोलिसांचा विशेष ‘वॉच’ आहे. भद्रकाली, सातपूर, नाशिकरोड या तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत राज्य राखीव दलाची प्रत्येकी एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत दंगल नियंत्रण पथकासह पोलिसांनी सशस्त्र संचलन केले.
विघ्नहर्त्या गणरायाचा महोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी शहर पोलीस आयुक्तालय स्तरावर या दहा दिवसांसाठी सुमारे दोन हजारांपेक्षा अधिक पोलीस रस्त्यांवर तैनात करण्यात आले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी ‘खाकी’ पुन्हा सरसावली आहे. शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्ताचे नियोजन आयुक्तालय हद्दीत करण्यात आले आहे. सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना स्थानबद्ध किंवा तडीपार करण्यात आले आहे. चार पोलीस उपआयुक्तांसह आठ सहायक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. विभागनिहाय बंदोबस्ताची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
१७ पोलीस निरीक्षक, ७८ उपनिरीक्षक, १ हजार ३५४ पोलीस कर्मचारी, ७०३ पुरु ष, २४० महिला गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव दलाच्या ३ तुकड्या (एसआरपीएफ), जलद प्रतिसाद पथकाची १ तुकडी (क्यूआरटी), दंगल नियंत्रण पोलिसांची १ तुकडी (आरसीपी), स्ट्रायकिंग फोर्सची १ तुकडी, वज्र वाहन-१, सीसीटीव्ही व्हॅन-१, ५१ जीप असा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
कायदा हातात घेणाऱ्यांची गय नाही
गणेशोत्सव काळात शहर पोलीस प्रशासन सतर्क असून, कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले. संशयास्पदरीत्या हालचाली करत गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडविण्याचा प्रयत्न करणाºयांवर कठोर कारवाई करत गुन्हे दाखल करण्याचे आदेश नांगरे पाटील यांनी सर्व अधिकाºयांना दिले आहेत.