मंत्र्यांच्या भेटीतील व्यक्तींची पोलिसांकडून होणार चौकशी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 01:42 AM2018-02-16T01:42:26+5:302018-02-16T01:42:34+5:30
मंत्र्यांच्या दौ-यांतर्गत दिल्या जाणा-या खासगी भेटीतील व्यक्ती, कार्यकर्त्यांची आगाऊ गोपनीय माहिती गोळा करून ती मंत्र्यांना देण्याचा आदेश बुधवारी पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारींना दिले.
नाशिक : मंत्र्यांच्या दौ-यांतर्गत दिल्या जाणा-या खासगी भेटीतील व्यक्ती, कार्यकर्त्यांची आगाऊ गोपनीय माहिती गोळा करून ती मंत्र्यांना देण्याचा आदेश बुधवारी पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारींना दिले.
सोमवारी नाशिक भेटीवर आलेले सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुन्हे दाखल असलेले करण गायकर यांच्या घरी भेट दिल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. मंत्री व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षिततेचे महत्त्व लक्षात घेता, नाशिक भेटीवर ज्या ज्या वेळी मंत्री येतील त्या त्या वेळी त्यांच्या दौºयाचा आगाऊ कार्यक्रम लक्षात घेता, मंत्र्यांना भेटणाºया व्यक्ती तसेच मंत्री भेट देणाºया ठिकाणांची गोपनीय माहिती यापुढे काढून तशी माहिती मंत्र्यांना देण्यात यावी, यासाठी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारींना तसे पत्रही पाठवणार असल्याचे सिंगल यांनी सांगितले.
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार करीत असलेल्या कार्यवाहीची माहिती मराठा समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधत असतो. नाशिकमधील कार्यकर्त्यांनी केलेल्या आग्रहाखातर गायकर यांच्या निवासस्थानी गेलो होतो, त्या वेळी सुमारे ३०० ते ४०० कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी बंदद्वार चर्चा अथवा गुफ्तगू झालेले नाही.
- चंद्रकांत पाटील,
सार्वजनिक बांधकाममंत्री
मराठा समाजाला आरक्षण तसेच समाजाच्या अन्य मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील माझ्या निवासस्थानी आले होते. त्यात अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाली. माझ्यावर दाखल असलेले गुन्हे खोटे असून, त्यातून मी निर्दोष सुटेन.
- करण गायकर, संस्थापक,
छावा क्रांतिवीर संघटना