पोलिसाचा संसार आगीमध्ये बेचिराख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 01:14 AM2018-02-27T01:14:38+5:302018-02-27T01:14:38+5:30
गंगापूररोडवरील सरकारवाडा पोलीस ठाण्याला लागून असलेल्या पोलीस कर्मचाºयांच्या सोसायटीमधील १४ क्रमांकाच्या इमारतीमध्ये पोलीस उपनिरीक्षक सुशीला नामदेव करोडवाल यांच्या बंद घराला दुपारच्या सुमारास आग लागली.
नाशिक : गंगापूररोडवरील सरकारवाडा पोलीस ठाण्याला लागून असलेल्या पोलीस कर्मचाºयांच्या सोसायटीमधील १४ क्रमांकाच्या इमारतीमध्ये पोलीस उपनिरीक्षक सुशीला नामदेव करोडवाल यांच्या बंद घराला दुपारच्या सुमारास आग लागली. घरामधून धूर येत असल्याचे लक्षात येताच शेजाºयांनी अग्निशामक दलाला घटनेची माहिती दिली. घरातील सर्व संसारोपयोगी वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने संसार बेचिराख झाला. गंगापूररोडवरील लहान उड्डाणपुलासमोर पोलिसांची वसाहत आहे. करोडवाल या कौटुंबिक कारणानिमित्त सकाळी निफाड येथे नातेवाइकांकडे गेल्या होत्या. दुपारच्या सुमारास मात्र अचानकपणे वायरिंगमध्ये बिघाड होऊन आग लागल्याने घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. अग्निशामक दलाला माहिती मिळताच पंचवटी उपकेंद्राचा बंब व मुख्यालयाचा मेगा बाऊजर बंब घटनास्थळी दाखल झाले. तातडीने जवानांनी पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविले. दुपारी शेजाºयांनी घटनेची माहिती करोडवाल यांना भ्रमणध्वनीवरून कळविली. संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास त्या घरी पोहचल्या. त्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन त्यांच्या समक्ष पंचनामा पूर्ण केला. पोलीस अधिकारी असल्यामुळे घराबाहेर जाताना त्यांनी सर्व खबरदारी घेत विजेचे सर्व स्वीच, सिलिंडरचे रेग्युलेटर बंद केले होते, अशी माहिती करोडवाल यांनी दिली. या आगीमध्ये सुमारे दोन लाखांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज करोडवाल यांनी व्यक्त केला आहे.