पोलीसपाटलांच्या नियुक्त्या सदोषच!
By admin | Published: June 2, 2016 11:43 PM2016-06-02T23:43:46+5:302016-06-03T00:04:40+5:30
चौकशीतील सत्य : गुणदानात हेराफेरी उघड
नाशिक : निफाड व सिन्नर तालुक्यातील पोलीसपाटील, कोतवाल भरतीबाबत प्रांत अधिकाऱ्यांवर होणाऱ्या गैरप्रकाराचे आरोप सत्य असल्याचे यासंदर्भात केल्या गेलेल्या चौकशीतून स्पष्ट झाले असून, जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या पद्धतीत आपल्याच मर्जीने बदल करून उमेदवारांच्या गुणदानात हेराफेरी केल्याचे तथ्य समोर आले आहे. या चौकशी अहवालामुळे थेट न्यायालयात धाव घेतलेल्या उमेदवारांच्या तक्रारींना पृष्टी तर मिळालीच; परंतु जिल्हाधिकारी प्रांत अधिकाऱ्यावर काय कारवाई करतात याची उत्सुकता आहे.
‘लोकमत’ने यासंदर्भात पुराव्यानिशी वृत्त प्रसिद्ध करून सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे प्रशासनालाही त्याची दखल घ्यावी लागली आहे. निफाड व सिन्नर तालुक्यात पोलीस पाटील, कोतवाल भरतीसाठी तोंडी मुलाखती घेण्यासाठी जिल्हाधिकारी बालकृष्णन् राधाकृष्णन् यांनी सर्व प्रांत अधिकाऱ्यांना समान पद्धती ठरवून दिलेली असताना निफाडचे प्रांत अधिकारी शशिकांत मंगरूळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवित आपल्याच मनमर्जीने मुलाखती घेतल्या. अशा मुलाखती घेताना करण्यात आलेल्या गुणदानातही मोठी तफावत संशयास्पद ठरल्याने यासंदर्भात तक्रारी करण्यात आल्या होत्या. मुलाखतीपूर्वीच काही उमेदवारांना ‘मध्यस्थां’करवी निरोप देऊन पैशांची मागणी करण्यात आली व त्यातूनच गुणदानात हेराफेरी झाल्याचा दावाही उमेदवारांनी केला होता. पुराव्या दाखल यासंदर्भात पैशांची मागणी व वशिलेबाजी करणारी ‘आॅडिओ क्लिप’ सोशल माध्यमावर फिरल्यामुळे तर प्रकरणाचे गांभीर्य वाढले होते. मात्र या साऱ्या प्रकाराबाबत मंगरूळे यांनी कानावर हात ठेवत, मुलाखत प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शी झाल्याचा छातीठोक दावा केला; परंतु उमेदवारांनी माहिती अधिकारात मागविलेली माहितीही मंगरूळे यांनी दिशाभूल करणारी दिल्याचे उघड झाले होते.