महापालिका कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे धोरण ठरविणार
By Admin | Published: August 2, 2016 02:19 AM2016-08-02T02:19:32+5:302016-08-02T02:19:43+5:30
आयुक्त : दरवर्षी १० ते २० टक्के बदल्या
नाशिक : महापालिकेत बऱ्याच वर्षांनंतर डॉ. प्रवीण गेडाम यांनी आपल्या आयुक्तपदाच्या कारकीर्दीत मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांच्या बदल्या करत अनेकांची मक्तेदारी मोडीत काढली, परंतु मोठ्या प्रमाणावर झालेली खांदेपालट आता प्रत्यक्ष कामकाजाला अडसर ठरू लागली आहे. त्यामुळेच नूतन आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी झालेल्या बदल्यांमध्ये काही प्रमाणात फेरबदल करण्याचे ठरविले असून, बदलीविषयक धोरण निश्चित करून दरवर्षी सुमारे १० ते २० टक्के बदल्या केल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
वर्षानुवर्षांपासून एकाच जागी भुजंगासन घालून बसलेल्या कर्मचाऱ्यांना डॉ. गेडाम यांनी धक्का देत महापालिकेच्या इतिहासात प्रथमच मोठ्या प्रमाणावर बदल्यांची प्रक्रिया राबविली होती. तीन टप्प्यात राबविलेल्या या बदली प्रक्रियेचे कमी-अधिक प्रमाणात पडसादही उमटले होते. पाणीकपातीच्या धोरणामुळे पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश थांबवून ठेवण्यात आले होते, परंतु गेडाम यांनी जाता-जाता सदर कर्मचारी व अधिकाऱ्यांच्याही बदल्यांचे आदेश जारी केले. महापालिकेतील उपअभियंता संवर्गातील २९ पैकी १६, सहायक अभियंता संवर्गातील ६० पैकी ५१ तर सहायक कनिष्ठ अभियंता संवर्गातील ३९ पैकी ३३ जणांच्या बदल्या करण्यात आल्याने सर्वच विभागात ‘नवा गडी-नवा राज’ सुरू झाला. त्याचा परिणाम प्रत्यक्ष कामकाजावर होऊ लागल्याने नूतन आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्याकडे खातेप्रमुखांनी काही अनुभवी कर्मचारी-अधिकारी वर्गाची मागणी केली.