पोलिओ अन् प्रचाराचाही रविवार!
By admin | Published: January 29, 2017 11:00 PM2017-01-29T23:00:29+5:302017-01-29T23:00:45+5:30
पोलिओ अन् प्रचाराचाही रविवार!
नाशिक : महापालिका निवडणुकीत मतदारराजाच्या संपर्कात राहण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून नाना क्लृप्त्या लढविल्या जात आहेत. त्यातल्या त्यात सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू असून, दिनविशेष शोधून काढत त्यानिमित्त शुभेच्छांचा अक्षरश: पाऊस पडत आहे. इच्छुक उमेदवारांना प्रचारासाठी रविवारी (दि.२९) झालेली पोलिओ लसीकरण मोहीमही धावून आली आणि पोलिओ रविवार हा प्रचाराचाही रविवार बनला. महानगरपालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी अद्याप राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या घोषित न झाल्याने अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया थंडावली आहे. मात्र, प्रत्येक इच्छुक उमेदवाराने आपल्या स्तरावर प्रचार सुरू केला आहे. घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत शिवाय पत्रकांचाही मारा केला जात आहे. प्रामुख्याने, बव्हंशी इच्छुक उमेदवारांनी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. त्यासाठी खासगी एजन्सीला काम देण्यात आले असून, त्या एजन्सीमार्फत रोज दिनविशेष पाहून त्यानुसार उमेदवारांच्या नाव-प्रभाग क्रमांकासह शुभेच्छा व्हॉट््सअॅपवर झळकत आहेत. रविवारी (दि.२९) शासनामार्फत पोलिओ लसीकरणाची मोहीम राबविण्यात आली. सदर मोहीम शासनामार्फत दरवर्षी राबविली जात असते. परंतु, यंदा या मोहिमेचा प्रचार परस्पर इच्छुक उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणावर केला गेला. ‘दोन थेंब जीवनाचे, डोस द्या पोलिओचे’ म्हणत नागरिकांना दिवसभरात लोकप्रतिनिधींना अचानक पोलिओ निर्मूलनाचा उमाळा दाटून आल्याने सोशल मीडियावर त्याविषयी नागरिकांकडून कमेंट््सही केल्या जात होत्या. (प्रतिनिधी)