अभियंता पाटील परतल्यानंतर राजकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 12:55 AM2018-06-02T00:55:12+5:302018-06-02T00:55:12+5:30
कामाच्या अतिताणामुळे बेपत्ता झालेले अभियंता रवींद्र पाटील सुखरूप परतल्यानंतर आता त्यावरून राजकारण सुरू झाले असून, भाजपातील एका गटाने प्रत्येक विभागात जाऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना काही ताण आहे काय? अशी पृच्छा करण्यास प्रारंभ केला आहे.
नाशिक : कामाच्या अतिताणामुळे बेपत्ता झालेले अभियंता रवींद्र पाटील सुखरूप परतल्यानंतर आता त्यावरून राजकारण सुरू झाले असून, भाजपातील एका गटाने प्रत्येक विभागात जाऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना काही ताण आहे काय? अशी पृच्छा करण्यास प्रारंभ केला आहे. तथापि, यावरून राजकारण रंगले असून, भाजपाने अशाप्रकारे पृच्छाभ्रमंती करण्याऐवजी प्रशासनाची बैठक घ्यावी त्यात गटनेत्यांना बोलवावे, असा सल्ला विरोधी पक्ष नेता अजय बोरस्ते यांनी दिला आहे. अभियंता रवींद्र पाटील यांनी कामाच्या अतिताणाचा उल्लेख केल्यानंतर त्यावरून महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरच टीका करण्यास प्रारंभ झाला होता. अनेक कर्मचारी संघटनादेखील मुंडे यांच्या विरोधात सरसावल्या होत्या. त्यांना काही राजकीय पक्षांनी पाठबळदेखील दिले होते. दरम्यान, पाटील शुक्रवारी (दि.१) हे सुखरूप घरी पोहोचल्यानंतर महापौर रंजना भानसी यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व त्यांना धीर दिला.
दरम्यान, या घटनेनंतर भाजपातील एका गटाने शुक्रवारी (दि.१) महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये जाऊन त्यांच्यावर कामाचा ताण आहे का वैगरे विचारणा करून आयुक्ततुकाराम मुंढे यांच्याविरोधातील नाराजांना चुचकारण्याचा प्रयत्न केला. याप्रकारामुळे भाजपातच दोन गट पडल्याचे दिसत आहे. महापालिकेत भाजपाचे बहुमत असताना त्याचा कायदेशीर वापर करीत महासभेसारख्या व्यासपीठाचा वापर करून घेण्याऐवजी भाजपाच्या युवा नगरसेवकांनी महापौर व पदाधिकाºयांना टाळून अधिकारी कर्मचाºयांच्या भेटीगाठी घेतल्या व त्यांच्या पाठीशी असल्याचा शब्द दिला. पदाधिकारी प्रशासनावर वचक निर्माण करण्यात अपयशी ठरल्याने भाजपातील एक गट अशाप्रकारची कृती करीत असल्याचे सांगण्यात येत असून, त्यामुळे भाजपात आता दोन गट पडल्याचे चित्र आहे. शुक्र वारी (दि. १) सकाळी महापालिकेतील बांधकाम, नगररचना व पाणीपुरवठा विभागात जाऊन मुकेश शहाणे, जगदीश पाटील, अॅड. श्याम बडोदे, राकेश दोंदे यांनी अधिकारी व कर्मचाºयांची भेट घेऊन दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
भेटीगाठी कशाला, गटनेत्यांची बैठक बोलवा
भाजपाच्या नगरसेवकांच्या एका गटाने सुरू केलेल्या या मोहिमेवर विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी टीका केली असून अशाप्रकारे दौरे करण्यापेक्षा प्रशासनातील अधिकाºयांची बैठक बोलवा तसेच गटनेत्यांनादेखील विश्वासात घेऊन माहिती घ्या, अन्यथा या भेटीगाठीनेच कर्मचारी अधिक तणावाखाली येतील असा टोला त्यांनी लगावला आहे. कामाच्या तणावामुळे अभियंता बेपत्ता होण्याचे प्रकरण मनपाच्या इतिहासात प्रथमच घडले आहे. प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी अशा मानसिकतेत असतील तर नाशिक स्मार्ट कसे होईल? असा प्रश्न बोरस्ते यांनी केला आहे. अधिकाºयांचे मनोबल वाढवण्यासह त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम करावे, असे सांगत, महापौरांनी याची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी केली आहे.