नाशिक जिल्हा परिषदेत पदाधिकाऱ्यांकडून नाराजी नाट्याचे राजकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 09:15 PM2018-11-03T21:15:31+5:302018-11-03T21:19:37+5:30
जिल्हा परिषदेत गेल्या तीन ते चार महिन्यांपासून विविध समितीच्या सभापती तथा सदस्यांकडून विकास कामांना गती मिळत नसल्याने सध्या त्यांनी प्रशासनावर रोष व्यक्त करून तसेच स्थायी समिती, विषय समिती आणि महासभेत नाराजी नाट्याचे प्रदर्शन करून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा पर्याय आजमवलेला दिसतो आहे.
नाशिक : जिल्हा परिषदेत गेल्या तीन ते चार महिन्यांपासून विविध समितीच्या सभापती तथा सदस्यांकडून विकास कामांना गती मिळत नसल्याने सध्या त्यांनी प्रशासनावर रोष व्यक्त करून तसेच स्थायी समिती, विषय समिती आणि महासभेत नाराजी नाट्याचे प्रदर्शन करून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा पर्याय आजमवलेला दिसतो आहे.
गेल्या महिन्यांपासून काही वेगवेगळ्या विभागाच्या सभापतींनी त्यांच्या विभागाच्या प्रशासकीय प्रमुखाने त्यांना योग्य तो मान सन्मान न दिल्याची तक्रार करून संबधित विषय समितीची सभा, स्थायी समितीची सभा आणि कधी कधीतर चक्क तीन महिन्यांनी होणारी सर्वसाधारण सभाही वेठीस धरल्याचे पाहायला मिळत आहे. यात वेगवेगळ्या विषय समितींकडून अधिकाऱ्यांकडून संबधित विभागाची माहिती मिळत नसल्याचे तक्रार करीत असतात. प्रत्यक्षात अशा सभा झाल्यानंतर संबधित अधिकारी हे सभापतींच्या दालनात त्यांच्याकडील माहिती घेऊन हजर होत असताना ही नाराज्य नाट्याची रणनिती का असा सवाल प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.प्रत्यक्षात मात्र गेल्या दोन वर्षात नोटबंदीच्या काळात जिल्हा परिषदेच्या निधी जिल्हा बँकेत अडकून पडल्याने कोणचेही विकास कामे होऊ शकले नव्हते. आता कुठे विकास कामांचा आराखडा तयार होत असचाना अद्याप निधी वाटपावरूनच गोंधळ सुरू असल्याने पदाधिकाऱ्यांना त्यांच्या गटात आणि जिल्ह्यात विकास कामे दाखवता येत नसल्याने वेगवेगळ्या विषयांवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरायचे आणि त्यातून प्रसिद्धी मिळवायची असे राजकारण सध्या जिल्हापरिषदेत रंगते आहे. याच कृषी पुरस्काराला आमंत्रित न केल्यामुळे उपाध्यक्ष नयना गावित यांच्या नाराजी नाट्यासह, कुपोषण निमूर्लन पुरस्काराची माहिती न दिल्यामुळे सभापती अर्पणा खोसकर यांनी व्यक्त केलेली नाराजी आणि आता मनिषा पवार यांनी अधिकारी माहिती देत नसल्यामुळे रोष व्यक्त करीत सर्वसामान्यांच्या विकासासंबंधी नियोजन व विचार विनिमय करण्याचा वेळ आपल्या मानपमानाच्या लेखाजोखा कधी विषय समितीत तर स्थायी समितीत आणि सर्वसाधारण सभेत मांडून प्रकाश झोतात राहण्याचे राजकारण सुरू केले आहे.