निकालाने बदलणार राजकीय समीकरणे

By admin | Published: August 30, 2016 01:48 AM2016-08-30T01:48:25+5:302016-08-30T01:52:43+5:30

भाजपाची सेनेला चपराक : ठाकरे बंधूंच्या एकत्रिकरणाची चर्चा

Political equations will change with the result | निकालाने बदलणार राजकीय समीकरणे

निकालाने बदलणार राजकीय समीकरणे

Next

नाशिक : महापालिकेच्या दोन प्रभागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने अनपेक्षितरीत्या विजय संपादन केल्याने पुढील वर्षी फेबु्रवारी २०१७ मध्ये होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोटनिवडणुकीत भाजपाने दोन्ही जागांवर विजय मिळवून शिवसेनेला चपराक दिली असून, सेना आणि मनसे उमेदवारांनी घेतलेली मते पाहता भाजपाला रोखण्यासाठी ठाकरे बंधूंच्या एकत्रिकरणाची चर्चा मात्र सुरू झाली आहे.
महापालिकेच्या प्रभाग ३५ आणि ३६साठी झालेल्या पोटनिवडणुकीत दोन्ही ठिकाणी भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत. पोटनिवडणुकीचा निकाल आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी वातावरणनिर्मितीकरिता महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने सर्वच पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. प्रारंभी शिवसेना व मनसेचा पोटनिवडणुकीत प्रभाव राहील अशी चर्चा सुरू असतानाच भाजपाने दोन्ही ठिकाणी मुसंडी मारून अनपेक्षितरीत्या यश संपादन केले आहे. त्यामुळे भाजपाच्या गटात उत्साहाला उधाण आले आहे. या पोटनिवडणुकीच्या निकालाने आगामी काळात राजकीय समीकरणांच्या बदलाची चर्चा सुरू झाली आहे. भाजपाचे कमळ फुलल्याने भाजपाकडे इच्छुकांचा ओघ वाढण्याची शक्यता आहे. पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसची दारुण अवस्था झाल्याने आगामी काळात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडण्याचीही भीती व्यक्त होत आहे. प्रभाग ३६ मध्ये कॉँग्रेस उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिला असला तरी त्यासाठी पक्षापेक्षा उमेदवाराचा व्यक्तिगत संपर्क कामी आला. त्यामुळे कॉँग्रेस पक्षानेही हुरळून जाण्याची गरज नाही. परिणामी, कॉँग्रेसच्याही गोटात फुटीची चिन्हे दिसून येत आहेत.
पोटनिवडणुकीत शिवसेनेनेही जोर लावला होता. किंबहुना सेना उमेदवारांच्या पदरात यश पडेल, अशी हवा निर्माण झाली होती. परंतु भाजपाने मुसंडी मारत सेनेलाही जोरदार चपराक लगावत आगामी सामना आपल्याशीच होणार, याची जाणीव करून दिली आहे. सत्ताधारी मनसेच्या उमेदवारांनी बऱ्यापैकी झुंज दिली असली तरी त्यांच्या मतांचा घटलेला टक्का हा मनसेची जादू संपल्याचेच निदर्शक मानला जात आहे. पोटनिवडणुकीत सेना-मनसे उमेदवारांनी बऱ्यापैकी मते घेतली आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपाला रोखण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्रिकरणाची चर्चा सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Political equations will change with the result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.