बारामतीची निवडणूक संपल्याने कलगी-तुरा थांबेल, गोडसेंच्या पाठीशी राष्ट्रवादी - छगन भुजबळ
By धनंजय रिसोडकर | Published: May 8, 2024 08:12 PM2024-05-08T20:12:29+5:302024-05-08T20:14:15+5:30
गोडसे यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी पूर्णपणे पाठीशी उभी राहणार
नाशिक : बारामतीची निवडणूक संपल्याचा मला सर्वाधिक आनंद आहे; कारण त्यामुळे काही दिवसांपासून सुरू असलेला कलगी-तुरा किंवा तुम्ही काय म्हणायचं ते म्हणा; पण तो थांबेल, अशी अपेक्षा असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी केले. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बुधवारी (दि. ८) पहिल्यांदाच हेमंत गोडसे यांनी भुजबळ फार्मवर जाऊन भुजबळ यांची भेट घेतली, त्यानंतर ते बोलत होते. गोडसे आणि भुजबळांमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली.
दोन्ही नेत्यांदरम्यान बंद दारांआड चर्चादेखील झाली. त्यानंतर पत्रकारांशी साधलेल्या संवादात भुजबळ यांनी शरद पवारसाहेब यांच्या पक्ष विलीनीकरणाबाबतचे वक्तव्य मी ऐकलेले नसल्याचे सांगितले. मात्र, कोणतेही प्रादेशिक पक्ष कुणातही विलीन होतील, असे मला वाटत नसल्याचेही नमूद केले. देशभरात अनेक प्रादेशिक पक्षांनी चांगले नेतृत्व प्रस्थापित करून राज्यांची सरकारे चालवली आहेत.
मात्र, पवारसाहेबांचा अनुभव मोठा आहे. त्यांनी केलेल्या विधानाचा अर्थ प्रत्येकजण आपापल्या परीने काढत असतो, असेही भुजबळ यांनी नमूद केले. गोडसे यांची आणि माझी ही काही पहिली भेट नसून, त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच्या प्रचार रॅलीत किंवा अर्ज भरतानादेखील मी होतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी उभे राहून प्रचारात १०० टक्के सहभागी होतील, असेही भुजबळ यांनी नमूद केले. नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी नाशिकमधील दोन्ही जागा निवडून आणू, असा विश्वास भुजबळांनी व्यक्त केला.