दिवाळीनंतर आता राजकीय फटाके!
By किरण अग्रवाल | Published: November 11, 2018 01:50 AM2018-11-11T01:50:05+5:302018-11-11T01:57:02+5:30
यंदा दिवाळीतील फटाक्यांचा आवाज दबलेलाच होता; परंतु दिवाळीनंतर होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय फटाक्यांचे आवाज मोठ्याने होण्याची शक्यता आहे. कारण स्वबळाच्या आगाऊ घोषणेमुळे शिवसेना-भाजपातील इच्छुकांची तयारी जोरात आहे, तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीमुळे तेथील इच्छुक जोरात आहेत. त्यामुळे आरोपांचे फटाके फुटणारच!
सारांश
शाळकरी मुलांमध्ये जागलेली पर्यावरणविषयक जागरुकता व न्यायालयाने घालून दिलेली मर्यादा, यामुळे यंदाची दिवाळी बऱ्यापैकी प्रदूषण व पर्यायाने फटाकेमुक्त ठरली; पण दिवाळीच्या या आनंद पर्वानंतर आता येऊ घातलेल्या निवडणुकांच्या अनुषंगाने कोणते व कसे राजकीय फटाके फुटतात याकडे लक्ष लागून राहाणे स्वाभाविक ठरले आहे. विशेषत: दिवाळीपूर्वी नाशिक जिल्ह्यातच झालेल्या एका कार्यक्रमानिमित्त शिवसेना-भाजपा नेत्यांचा परस्परांवर झालेला कौतुकाचा वर्षाव पाहता, उभय पक्षीयांची पावले ‘युती’च्या दिशेने पडत असल्याचा अंदाज बांधला गेला असला तरी; त्यासंदर्भातील निर्णय काय होतो आणि तो स्वबळाच्या ईर्षेने पेटलेल्या व तयारीसही लागलेल्या उमेदवारी इच्छुकांच्या कितपत पचनी पडतो यावरच या राजकीय फटाक्यांचा आवाज अवलंबून राहणार आहे.
दिवाळी आली आली म्हणता गेलीही. निसर्गाने डोळे वटारलेले असल्याने दुष्काळी स्थितीचा सामना करावा लागत असलेल्या बळीराजाची ही दिवाळी तशी जेमतेम राहिली. नोटाबंदीच्या द्विवर्ष पूर्तीनंतर काहीशा सावरलेल्या वर्गाने सुस्कारा टाकलेला होता; त्यामुळे बाजारात तेजी दिसलीही परंतु ती सार्वत्रिक स्थिती म्हणता येऊ नये. अशात पर्यावरणविषयक जागरुकतेमुळे फटाक्यांवरही परिणाम झाला. यंदा दरवर्षाइतका ‘आवाज’ झाला नाही. पण हे फटाके फारसे फुटले नसले तरी यापुढील काळात राजकीय फटाके मोठ्या प्रमाणात आवाज करण्याची शक्यता आहे. आणखी दोनेक महिन्यात लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता घोषित होण्याची शक्यता आहे. लोकसभा व विधानसभा एकत्र घेतल्या जातात की कसे, याचा निर्णय अद्याप होणे बाकी आहे; तसेच स्वबळाची घोषणा करून बसलेल्या शिवसेनेला पुन्हा सोबत घेण्यात भाजपाला यश येते की नाही; हेही स्पष्ट व्हायचे आहे. या दोघा पक्षात आलेला कडवटपणा व त्यातून होणारे परस्परविरोधी आवाज सुरूच असले तरी ते क्षीण होत चालल्याचेही दिसून येणारे आहे. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव (ब) येथे शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे व भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमातही तेच दिसून आले. एरव्ही शिवसेनेच्या लोकांनी भाजपाचे किंवा त्या पक्षाच्या नेत्यांचे कौतुक करणे म्हणजे आफत ओढवून घेणारे ठरत आले आहे. परंतु पिंपळगावच्या कार्यक्रमात खुद्द उद्धव ठाकरे यांच्या समोर भाजपा नेत्यांचे कौतुक केले गेले. भाजपा आमदार देवयानी फरांदे यांचा सत्कारही केला गेला. ठाकरे व चंद्रकांत पाटील यांनीही एकमेकांची स्तुती केली. त्यामुळे तेच चित्र कायम राहिले तर स्वबळाच्या आशेने तयारीला लागलेल्यांचा भ्रमनिरास घडून त्याचा म्हणून आवाज ऐकायला मिळू शकेल. परिणामी दिवाळी सरली असली तरी राजकीय फटाक्यांचे आवाज आता ऐकू येतील.
नाशिक जिल्ह्याचाच विचार करता, ‘युती’ झाली तर काय आणि स्वबळ आजमावले गेले तर काय, हा जसा औत्सुक्याचा विषय आहे तसा विद्यमान कुणाची उमेदवारी बदलली गेली तर काय, असाही विषय चर्चित ठरून गेलेला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीसह समविचारी पक्षांची आघाडी निश्चित आहे. त्यामुळे तिला तोंड देण्यासाठी शिवसेना-भाजपाची युती नाइलाजाने कायम ठेवली गेली तर नाशकात विद्यमान खासदारांची उमेदवारी कायम ठेवण्याचे संकेत आहेत, परंतु दिंडोरीत काय असा प्रश्न आहे. प्रतिपक्षाकडून म्हणजे राष्ट्रवादीकडून डॉ. भारती पवार यांचे नाव घेतले जात असल्याने महिलेसमोर महिला उमेदवार या विचाराने नाशिकच्या महापौर सौ. रंजना भानसी यांचे नाव त्यासाठी पुढे आलेले दिसत आहे. अशा स्थितीत तेथील भाजपाचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे काय, असा प्रश्न उपस्थित होणारा आहे. स्वबळच आजमावले गेले तर नाशकात भाजपाचा उमेदवार कोण, याचीही अद्याप स्पष्टता होऊ शकलेली नाही. माजी आमदार माणिकराव कोकाटे यांचे नाव त्यासाठी आघाडीवर असले तरी ते अखेरपर्यंत आघाडीवरच राहील याची शाश्वती देता येणारी नाही. अशा स्थितीत त्यांची तयारी पाहता, युती झाल्याने जागा विद्यमान शिवसेनेकडे गेली अथवा युती न होता भाजपाची उमेदवारी दुसºयाला दिली गेली तर फटाके फुटणे क्रमप्राप्त आहे.
दुसरीकडे ‘आघाडी’ निश्चित आहे. परंतु नाशकातून उमेदवार कोण हे नक्की नाही. गेल्यावेळी छगन भुजबळ यांच्यासारख्या मातब्बर नेत्यास पराभव पाहावा लागला होता. त्यामुळे यंदा ते निवडणुकीच्या रिंगणात उतरतात की नाही, येथूनच प्रश्न आहे. पक्षाचा आग्रह त्यांनाच असेलही, परंतु त्यांनी नकार दिला तर कोण, हे दृष्टिपथात नाही. नावे भलेही अनेक घेतली जातात. परंतु सद्य राजकीय स्थितीत ही लढाई झेपेल व पक्षालाही त्याबाबत खात्री वाटेल असे नाव समोर नाही. दिंडोरीतील उमेदवारीचा निर्णय उपरोक्त लेखानुसार संभावित आहे, तर धुळे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसतर्फे यंदा मालेगावचे डॉ. तुषार शेवाळे यांचे नाव चर्चेत आले आहे. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेसारख्या मोठ्या संस्थेचे पाठीशी असणारे बळ व नात्या-गोत्यांचे संबंध पाहता शेवाळेंची उमेदवारी तेथे नवीन समीकरण निर्माण करू शकणारी आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही फार्मात येण्याच्या प्रयत्नात आहे. पण त्यांच्याकडेही डॉ. प्रदीप पवार यांच्याखेरीज नवीन चेहरा दिसत नाही. स्थानिक पातळीवरील संघटनात्मक बळही तसे यथातथाच आहे. डाव्या पक्षांनीही बºयापैकी मशागत चालविली आहे. प्रस्थापित विरोधकांपेक्षा माकपा व भाकपातर्फेच विविध प्रश्नांवर मोर्चे काढले जात असतात. यातून विधानसभा व लोकसभा निवडणूक लढविण्याची त्यांची तयारी दिसून येणारी आहे. परंतु मनसे असो की डावेपक्ष, ते स्वबळ आजमावण्याऐवजी काँग्रेस आघाडीसोबत जाण्याची शक्यता मोठी आहे. असे झाले तर माकपाकडून दिंडोरी मतदारसंघावर दावा केला जाऊ शकतो. त्यामुळे राष्टÑवादीच्या उमेदवारीसाठी तयारी चालविलेल्यांकडून फटाके फुटू शकतात. नाही तर लोकसभेसाठी पाठिंब्याच्या बदल्यात विधानसभेसाठी या पक्षांना काँग्रेस व राष्ट्रवादीकडून जागा सोडली जाण्याची अपेक्षा असेल. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील डाव्यांचे प्रभाव क्षेत्र असलेले दिंडोरी व इगतपुरी मतदारसंघ अनुक्रमे राष्ट्रवादी व काँग्रेसच्या ताब्यात आहेत. ते डाव्यांसाठी सोडले जाण्याची शक्यता नाही. नाशकात मनसेला कोणती जागा सोडली जाणार? तेव्हा तसे घडून न आल्यास त्याही पातळीवर आरोपांचे व फुटीचे फटाके फुटणे स्वाभाविक ठरेल.