राजकीय हालचाली गतिमान
By admin | Published: October 20, 2016 12:00 AM2016-10-20T00:00:02+5:302016-10-20T00:13:43+5:30
चुरस : पालिका निवडणुकीसाठी गुप्त बैठकांना वेग
सटाणा : येथील पालिकेचा निवडणूक कार्यक्र म घोषित होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. यंदा थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक होत असून, वीस वर्षांनंतर अध्यक्षपद खुले झाल्याने इच्छुकांच्या संख्येत साहजिकच वाढ होऊन पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी कॉँग्रेस व केंद्र-राज्यातील सत्ताधारी भाजपा-शिवसेना युतीत उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. भाजपात तिकीट मिळविण्यासाठी दोन डॉक्टरांनी राजधानीत तळ ठोकल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे अन्य इच्छुकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे.
थेट अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी आमदार संजय चव्हाण, पालिकेचे गटनेते काका रौंदळ, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे, डॉ. व्ही. के. येवलकर, माजी नगरसेवक शफिक कादिर मुल्ला यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. शहरासाठी विकास योजना खेचून आणण्यात हातखंडा असलेले माजी आमदार चव्हाण यांनी उमेदवारी करावी जेणेकरून शहरविकासात भर पडेल, असेही जनमत आहे. काका रौंदळ यांचाही जनसंपर्क व पक्षनिष्ठा याच्या जोरावर त्यांनी दावेदारी केली आहे, तर नगराध्यक्ष म्हणून कामाचा अनुभव तसेच सोनवणे परिवाराचा पाठिंबा व अल्पसंख्याकांशी असलेले संबंध याच्या जोरावर पांडुरंग सोनवणे यांनी दावेदारी केली आहे.
शफिक मुल्ला यांनी एकगठ्ठा मतदान व राष्ट्रवादी पक्षाचा शहरातील वाढता प्रभाव आपल्याला रोखू शकत नाही या भावनेने पक्षाकडे दावेदारी केली आहे. इच्छुकांची दावेदारी सुरू असली तरी या रस्सीखेचमध्ये कोण बाजी मारते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, केंद्र व राज्यात सत्ता असलेल्या भाजपा-सेना युतीच्या गोटात कालपर्यंत शांतता असताना आज इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपाकडून डॉ. विलास बच्छाव, डॉ. संजय पाटील, डॉ. प्रकाश जगताप, बाजार समितीचे सभापती रमेश देवरे, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, विरोधी पक्षनेते साहेबराव सोनवणे, सरोज चंद्रात्रे यांनी दावेदारी केली आहे. असे असले तरी
पक्षश्रेष्ठीं सक्षम उमेदवारांच्या शोधात आहे.
थेट अध्यक्षपदाचा कोणता उमेदवार सक्षम नगरसेवकपदाच्या उमेदवारांचे पॅनल देऊ शकते याकडे पक्षश्रेष्ठींचा कल असून, त्याबाबत चाचपणी सुरू असताना दोन डॉक्टरांनी तिकीट मिळविण्यासाठी थेट राजधानीत तळ ठोकला आहे. भाजपा हायकमांडच्या संपर्कात उभय
डॉक्टर असून, त्यांच्यात रस्सीखेच सुरू असली, तरी बागलाणचे पालकत्व ज्यांच्याकडे आहे ते खासदार व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. (वार्ताहर)