उमेदवारांच्या कोलांटउड्यांनी राजकीय पक्ष हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2021 01:00 AM2021-12-19T01:00:10+5:302021-12-19T01:01:37+5:30
पाच वर्षे जनहित, सामान्यांचे प्रश्न, विकासाचे राजकारण, पारदर्शकता, सर्वधर्मसमभाव, धर्मनिरपेक्षता अशा मुद्यांची माळ जपणाऱ्या राजकीय पक्षांची हतबलता नगरपंचायत निवडणुकीत दिसून आली. महत्त्वाकांक्षी कार्यकर्ते राजकीय पक्षांना झुकवत असल्याचे प्रसंगी पक्षीय उमेदवारी लाथाडून अपक्ष उमेदवारी केल्याची उदाहरणे समोर आली आहेत. जात, धर्म व पैसा याला महत्त्व देत मतदारानुनयी भूमिका सगळ्याच राजकीय पक्षांनी घेतली आहे. त्यामुळे मोजक्या कुटुंबांच्या हातात नगरपंचायतीची सत्ता केंद्रित राहण्याची परंपरा कायम राहील, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
बेरीज वजाबाकी
मिलिंद कुलकर्णी
बेसावध पक्ष, महत्त्वाकांक्षी उमेदवार
कळवण, देवळा, दिंडोरी, निफाड, पेठ व सुरगाणा या सहा नगरपंचायतींची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. मंगळवारी मतदान होत असून, २९ दिवसांनी निकाल कळणार आहे. तत्पूर्वी निवडणुका स्थगित ठेवलेल्या ओबीसींच्या ११ जागांवर १८ जानेवारी रोजी निवडणूक होईल. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या विषयावर कोणत्याच निवडणुका होणार नाही, अशा मनोभूमिकेत असलेल्या राजकीय पक्षांची सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि राज्य निवडणूक आयोगाने केलेली त्याची अंमलबजावणी पाहता गोची झाली आहे. बेसावध असताना या निवडणुका जाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्षांनी तारांबळ उडाली. सर्व जागांवर उमेदवार उभे करण्यात यश आलेले नाही, हा त्याचा दृश्य परिणाम आहे.
सर्व जागांवर उमेदवार नाही
गाव तेथे शाखा, शतप्रतिशत, वन बुथ टेन युथ, पन्ना प्रमुख असे संघटनात्मक उपक्रम पाच वर्षे राबविणाऱ्या राजकीय पक्षांना सर्व जागांवर उमेदवार मिळू नये, यावरून अभियानामधील फोलपणा स्पष्ट होतो. ८७ जागांसाठी मतदान होत आहे. त्यापैकी भाजप : ७८, राष्ट्रवादी कॉंग्रेस : ६१, कॉंग्रेस : ३३, शिवसेना : ४६ जागा लढवत आहे. दिंडोरीत काँग्रेसचे २ व शिवसेनेचे ८ उमेदवार असून, त्यांनी आघाडी केली आहे.
उमेदवारांपुढे पक्ष हतबल
भाकरी फिरवली नाही तर करपते, हे तत्त्व राजकारणात हमखास लावले जात असले तरी आता भाकरी फिरविण्याची वेळ उमेदवार येऊ देत नाही, ते चूल बदलायला मागेपुढे पाहत नाही. या निवडणुकीत हे प्रामुख्याने दिसले. राजकीय पक्षांचा उमेदवारांवर भरवसा नाही आणि उमेदवारांचा पक्ष व नेत्यांवर विश्वास उरलेला नाही. राजकीय कोलांटउड्या आणि नेत्यांनी नातेवाईक, स्वीय सहायकांना दिलेली उमेदवारी हे त्याचे दृश्य परिणाम आहेत. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष अशी जबाबदारीची पदे भूषविलेले कार्यकर्ते उमेदवारीसाठी रात्रीतून पक्ष बदलताना दिसून आले. निष्ठा, बांधिलकी हे शब्द राजकारणातून हद्दपार होत आहे, हे त्याचेच निदर्शक आहे.
महिला उमेदवारांचा दबदबा
या निवडणुकीत महिला उमेदवारांचा दबदबा आहे. एकूण २९२ उमेदवारांपैकी १६० महिला उमेदवार रिंगणात आहेत. पुरुष उमेदवार १३२ आहेत. ११ ठिकाणी महिला उमेदवार या पुरुष उमेदवारांविरुद्ध उभ्या ठाकल्या आहेत. ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव असतानाही त्यापेक्षा अधिक महिला उमेदवार उभे राहणे, स्त्रीसशक्तीकरणाच्यादृष्टीने स्वागतार्ह पाऊल आहे. अर्थात या सर्वसामान्य महिला किती आणि प्रस्थापित कुटुंबातील महिला किती हादेखील शोध घ्यायला हवा. पेठमध्ये २३४५ महिला मतदार, तर पुरुष मतदार त्यापेक्षा कमी म्हणजे २२९१ आहेत. कळवणमध्ये पुरुष : ७८३५, तर महिला : ७५६८ मतदार, निफाडमध्ये पुरुष : ८६६२, महिला : ८५११ मतदार आहेत. याचा परिणाम असू शकतो.