मालेगावी राजकीय पक्षांचा लागणार कस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:17 AM2021-09-23T04:17:17+5:302021-09-23T04:17:17+5:30
महापालिकेची निवडणूक वॉर्डनिहाय होईल या आशेने इच्छुकांनी मोर्चेबांधणी व संपर्क यंत्रणा कार्यरत केली होती. हौसेनौसे इच्छुकांनी प्रभागात छोटी-मोठी कामे ...
महापालिकेची निवडणूक वॉर्डनिहाय होईल या आशेने इच्छुकांनी मोर्चेबांधणी व संपर्क यंत्रणा कार्यरत केली होती. हौसेनौसे इच्छुकांनी प्रभागात छोटी-मोठी कामे करण्यास सुरुवात केली होती; मात्र महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडणूक लढविणाऱ्यांचा या प्रभाग पद्धतीमुळे हिरमोड झाला आहे. महापालिकेत सध्या कॉंग्रेस व सेनेची सत्ता आहे. महापालिकेत कॉंग्रेसचे २७, महागठबंधन आघाडीचे २६, शिवसेनेचे १२, भाजपचे ९, एमआयएम ७, जनता दल ६ असे पक्षीय बलाबल आहे. राजकीय पक्षांनी आपले संख्याबळ टिकवून ठेवण्यासाठी आता प्रभागनिहाय राजकीय हालचाली गतिमान कराव्या लागणार आहेत. व्यक्ती केंद्रित राजकारण न राहता प्रभागातील समीकरणांवर निवडणूक लढविली जाणार आहे. बहुसदस्यीय प्रभाग रचनेमुळे राजकीय पक्षांना कसरत करावी लागणार आहे. गेल्या निवडणुकीत चार सदस्यीय प्रभाग पद्धत होती. महापालिकेत एकूण २१ प्रभागातून ८४ नगरसेवक निवडून गेले होते. आता तीन सदस्यीय प्रभाग रचनेमुळे प्रभागांची संख्या वाढण्याची शक्यता असून प्रभागांचे सीमांकनही बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुणाच्या प्रभागाची तोडमोड होते आणि कुणाला फायदा होतो, हे येता काळच ठरवेल.