आयारामांमुळे भाजपात नेत्यांविरुद्ध बंड!

By admin | Published: January 17, 2017 01:01 AM2017-01-17T01:01:33+5:302017-01-17T01:01:51+5:30

बैठकींना प्रारंभ : निष्ठावंतांनी काय सतरंज्याच उचलायच्या?

Political rebellion against the leaders of the party! | आयारामांमुळे भाजपात नेत्यांविरुद्ध बंड!

आयारामांमुळे भाजपात नेत्यांविरुद्ध बंड!

Next

 नाशिक : भाजपाच्या स्थापनेपासून पक्षात काम करणाऱ्या किंबहुना पक्षात हयात घालविणाऱ्या कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुकीत अच्छे दिनची आस असताना त्यांना दूर लोटून नाशिक भाजपाने आयारामांसाठी लाल गालीचे अंथरण्यास सुरुवात केली आहे. शहराध्यक्ष आणि अन्य आमदारांनी आपल्या मतदारसंघासाठी सोयीची राजकीय गुंतवणूक करण्यास सुरुवात केल्याने भाजपात बंड उभे राहण्यास प्रारंभ झाला आहे. नाराज निष्ठावान भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकांना नाशिकमध्ये प्रारंभ झाला असून, त्याचा फटका निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी स्वबळावर म्हणजे शिवसेनेला बरोबर न घेता निवडणूक लढविणाऱ्या भाजपाला अनेक प्रभागात उमेदवार मिळाले नव्हते. शेवटच्या टप्प्यात मागेल त्याला ए बी फॉर्म दिले जात होते आणि आज प्रत्येक प्रभागात भाजपाकडे दहा ते वीस उमेदवार इच्छुक आहेत. त्यातच शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप आणि पश्चिम मध्य नाशिकच्या आमदार सीमा हिरे तसेच अन्य अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्य निवडणुकीत उतरविण्याची तयारी केली आहे. आपल्या वारसांना निवडून आणण्यासाठी आणि भविष्यातील महापौरपदावर विराजमान करण्यासाठी भाजपाचे स्थानिक पदाधिकारी वाट्टेल त्या तडजोडी करीत असून, आगामी विधानसभा निवडणुतही विजयाचे समीकरण कसे जुळवता येईल त्यादृष्टीने विरोधी पक्षातील उमेदवारांसाठी पायघड्या टाकत आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आणि अनेक वर्षे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ज्यांच्याशी संघर्ष केला अशा आगंतुकांना उमेदवारी देण्यात येत असल्याने निष्ठावान भाजपा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. यासंदर्भात रविवारी नाशिकरोड विभागातील भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली आणि पक्षात आलेल्या आयारामांना उमेदवारी देण्यासाठी सुरू असलेल्या हालचालींवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. पंचवीस ते तीस वर्ष हयात घातली आणि आता फळे मिळण्याची वेळ आल्यानंतर मात्र बाहेरील उमेदवारांना संधी दिली जात आहे. कार्यकर्त्यांनी आयुष्यभर काही बैठकीसाठी संतरंजा टाकण्याचे आणि उचलण्याचेच काम करायचे काय, असा सवाल या बैठकीत करण्यात आला. या बैठकीनंतर आता पंचवटी आणि सिडको तसेच पश्चिम विभागातही बैठका घेण्याचे नियोजन सुरू आहे. अशा प्रकारच्या बैठका प्रत्येक प्रभागात होत राहिल्यास त्यातून वेगळ््याच प्रकारचा संदेश जाऊ शकतो. भाजपातील या नाराजीला वेळीच दूर केले नाही, तर निवडणुकीत भाजपालाच त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Political rebellion against the leaders of the party!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.