मराठा समाजाच्या एकतेबद्दल राजकारण्यांना भीती वाटते ! - छगन भुजबळ
By धनंजय रिसोडकर | Published: April 23, 2024 05:50 PM2024-04-23T17:50:20+5:302024-04-23T17:51:06+5:30
भुजबळ यांची उमेदवारी जाहीर करण्यात विलंब झाल्याने भुजबळ यांनीच उमेदवारीच्या स्पर्धेतून बाहेर पडत असल्याचे जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले होते.
नाशिक : महायुतीचा नाशिकमध्ये किंवा अन्यत्र कुठेही उमेदवार असल्यास आणि त्याने बोलावल्यास प्रचारासाठी नक्कीच जाणार आहे. मात्र, मी प्रचारासाठी गेल्याने मराठा समाज नाराज होईल, असे काहींना वाटत असल्यास त्यांचे नुकसान होऊ नये. मराठा समाजात जितकी एकता दिसते तितकी इतर मागासवर्ग किंवा अन्य समाजात दिसत नसल्याने मराठा समाजाच्या एकतेबद्दल राजकारण्यांना भीती वाटते, असे सांगतानाच उमेदवारीबाबत मी अजिबात नाराज नसल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना सांगितले.
शहर व जिल्हा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मंगळवारी (दि. २३) सकाळी भुजबळ फार्म कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. भुजबळ यांची उमेदवारी जाहीर करण्यात विलंब झाल्याने भुजबळ यांनीच उमेदवारीच्या स्पर्धेतून बाहेर पडत असल्याचे जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले होते. बैठक पार पडल्यानंतर भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना भुजबळ यांनी तिन्ही पक्षांकडे भरपूर उमेदवार असल्याचे सांगितले.
भाजपकडे तर तीन आमदारांसह दिनकर पाटील आणि शांतिगिरी महाराज हा पर्याय, तर शिंदेसेनेकडेही गोडसे, बोरस्ते, करंजकर असे पर्याय आहेत. मात्र, प्रतिस्पर्धी उमेदवाराची संपूर्ण मतदारसंघातील प्रचाराची पहिली फेरीदेखील पार पडली असल्याने महायुतीच्या वतीने लवकरात लवकर उमेदवार जाहीर करणे आवश्यक असल्याचेही भुजबळ यांनी नमूद केले.