कोरोनाने ‘रोम’ जळत असताना राजकारणी निवडणुकीचे ‘फिडल’ वाजवित आहेत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:10 AM2021-06-30T04:10:18+5:302021-06-30T04:10:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सटाणा : कोरोनासारख्या महामारीत अनेक जणांच्या घरांना कुलूप लागले. बाप आहे तर आई नाही, मूल ...

Politicians are playing the election 'fiddle' while Corona is burning 'Rome' ... | कोरोनाने ‘रोम’ जळत असताना राजकारणी निवडणुकीचे ‘फिडल’ वाजवित आहेत...

कोरोनाने ‘रोम’ जळत असताना राजकारणी निवडणुकीचे ‘फिडल’ वाजवित आहेत...

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सटाणा : कोरोनासारख्या महामारीत अनेक जणांच्या घरांना कुलूप लागले. बाप आहे तर आई नाही, मूल आहे तर मातृपितृचे छत्र नाही अशी भयावह परिस्थिती असताना सटाण्यात मात्र पुढाऱ्यांना पालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. आरोग्याच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीच्या मंडळीने निष्क्रियतेचा ठपका आणि भ्रष्टाचाराचे आरोप करून नगराध्यक्षांना लक्ष्य केले तर नगराध्यक्षांनीदेखील आरोपांचे खंडन करून आघाडीच्या मंडळीचा समाचार घेतला आहे. ऐन पावसाळ्यात सुरू असलेल्या राजकीय चिखलफेकीमुळे शहरातील राजकारण ढवळून निघाले आहे. दरम्यान, आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या काळात घरात विलगीकरण केलेली मंडळी अचानक राजकारणात सक्रिय झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सटाणा शहराकडे एक संवेदनशील गाव म्हणून पाहिले जाते. पोलिओने अपंगत्व आलेल्यांवर यशस्वी शस्रक्रिया असो वा किल्लारी आणि कच्छभूज येथील भूकंपग्रस्तांच्या मदतीला धावणारे गाव म्हणून सटाण्याची ख्याती आहे. याच शहरात कोविडच्या महामारीच्या काळात अनेक हात मदतीसाठी पुढे आले. त्यात काही हात अदृश्यही होते. काहींनी राजकीयदृष्ट्या हात धुऊन घेण्याचे कामदेखील केले. हे सगळे उघड्या डोळ्यांनी पाहणाऱ्या सुज्ञ जनतेने त्याच वेळेस आपल्या भल्यासाठी कोण योग्य आणि कोण अयोग्य हे ठरवून घेतल्याचे बोलले जात असताना गेल्या आठवड्यात अचानक ‘क्लीन’ समजणाऱ्या नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्यावर ऐन पावसाळ्यात आरोग्याच्या प्रश्नावर चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला तो महाविकास आघाडीच्या ‘गड्यांनी’. साडेचार वर्षांत मागे वळून पाहिले असता अनेकदा पुलाखालून पाणी वाहून गेल्याचे शहरवासीयांना अनुभवायला मिळाले. मराठा मोर्चामुळे एकवटलेले अल्पसंख्याक, अचानक झालेली नोटबंदी अशा भीषण परिस्थितीत मातब्बर उमेदवारांना धोबीपछाड देऊन अपक्ष मोरे ‘बाजीगर’ ठरले. त्यानंतर भाजप-सेना युतीच्या तत्कालीन सरकारच्या मंत्र्यांशी जुळवून घेत सन १९९७ मध्ये मंजूर झालेली केळझर पाणीपुरवठा योजना राजकीय बळी ठरल्यानंतर सटाणा शहरासाठी पुनंद पाणीपुरवठा योजना पदरात पाडून घेण्यात मोरे यशस्वी ठरले. दरम्यान, एकेकाळी एकच नाण्याच्या दोन बाजू असलेले नगराध्यक्ष मोरे आणि माजी आमदार संजय चव्हाण यांच्यात वितुष्ट आले. अनेक मुद्द्यांवर ते आमनेसामनेदेखील आले. मात्र त्यांची अतूट मैत्री आजही कायम आहे. असे असताना चव्हाण घटक असलेल्या महाविकास आघाडी आणि नगराध्यक्ष यांच्यात चिखलफेक सुरू झाल्याचे बघायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष विजय वाघ, रत्नाकर सोनवणे, डॉ. व्ही. के. येवलकर, भरत खैरनार, शिवसेनेचे लालचंद सोनवणे, जयप्रकाश सोनवणे, यशवंत कात्रे, मोहन खैरनार यांनी शहराचे आरोग्य रामभरोसे असल्याचा आरोप करीत शहरातील आरोग्याच्या प्रश्नावर बोट ठेवले. डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया यांसारखे आजार नगराध्यक्ष मोरे यांच्या बेफिकिरीमुळे बळावले असल्याचा आरोपदेखील महाविकास आघाडीने केला. एवढ्यावर न थांबता पालिकेच्या कामात भागीदार असल्याचा गंभीर आरोपदेखील करण्यात आला. हे गंभीर आरोप लावून नगराध्यक्ष मोरे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न केला जात असला तरी मोरे यांच्यावर करण्यात आलेले आरोप महाविकास आघाडीच्या मंडळीना सिद्ध करणे आज तरी अवघड आहे. असे असले तरी यानिमित्ताने आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण मात्र ढवळून निघाले आहे.

इन्फो...

नगराध्यक्ष मोरेही गरजले

नगराध्यक्ष मोरे यांना पालिकेच्या कामात भागीदार असल्याचा आरोप करून डिवचल्यानंतर स्वच्छ, सुंदर शहराचे गलिच्छ राजकारण काही माजी लोकप्रतिनिधी करीत असल्याचा आरोप केला. पालिकेच्या तीन कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात बलिदान दिले असताना भ्रष्टाचारासारखे आरोप करून कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण केले जात असल्याचे सांगून मोरे यांनी भावनिक मुद्द्याला हात घालण्याचा प्रयत्न केला. एकंदरीत महाविकास आघाडी आणि नगराध्यक्ष मोरे यांनी एकमेकांवर चिखलफेक करून निवडणुकीची वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला असला तरी कोरोनासारख्या महामारीने भयभीत झालेल्या शहरवासीयांची आजतरी हे चित्र बघण्याची मानसिकता नसल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Politicians are playing the election 'fiddle' while Corona is burning 'Rome' ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.