'या' ठिकाणी शिवसेना-भाजपमध्येच होणार चुरशीची लढाई; गट विभाजनाचा नेमका कोणाला फायदा?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 03:15 PM2022-03-24T15:15:02+5:302022-03-24T15:19:13+5:30
किशोर इंदोरकर मालेगाव कॅम्प - गेल्या निवडणुकीत तालुक्यातील निमगाव गटातील दिग्गज नेत्यांना नवख्या उमेदवारांनी पराभवाची धूळ चारली होती, त्यामुळे ...
किशोर इंदोरकर
मालेगाव कॅम्प - गेल्या निवडणुकीत तालुक्यातील निमगाव गटातील दिग्गज नेत्यांना नवख्या उमेदवारांनी पराभवाची धूळ चारली होती, त्यामुळे या गटातील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. तरीही नवीन आरक्षणानुसार कोणत्या उमेदवारांना कौल मिळेल, याची गटात चर्चा सुरू असली, तरी खरी लढत शिवसेना-भाजपमध्येच होणार आहे.
मालेगाव तालुक्यातील प्रतिष्ठेच्या अशा निमगाव गटात काही दशकांपासून तालुक्यातील ग्रामीण भागातील जनता दलाचे नेतृत्व करणारे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मधुकर हिरे यांचे वर्चस्व होते. गेल्या निवडणुकीत नवखे असलेले भाजपचे जे. डी. हिरे यांनी मधुकर हिरे यांचा पराभव केला. मधुकर हिरे यांनी शिवसेनेकडून उमेदवारी लढविली होती. या पराभवामुळे अनेक वर्षे सत्ता ताब्यात असलेल्या मधुकर हिरेंच्या पराभवाची जिल्हाभर चर्चा झाली होती. तरीही या गटावर पूर्वापार माजी मंत्री प्रशांत हिरे, अद्वय हिरे, अपूर्व हिरे या राजकीय घराण्याचे प्राबल्य होते. यंदा होणाऱ्या निवडणुकीत पुन्हा शिवसेना - भाजप समोरासमोर येणार असल्याचे राजकीय जाणकार सांगतात. गेल्या निवडणुकीत शिवसेना, भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक मायकल, अपक्ष संतोष मोरे निवडणूक रिंगणात होते.
निमगाव गटात सुमारे ४,८०,००० मतदार आहेत व गत निवडणुकीत भाजपचे जे. डी. हिरे यांनी शिवसेनेचे मधुकर हिरे यांचा सुमारे १,७०० मतांनी पराभव केला होता. त्यामुळे शिवसेनेला येथे पुन्हा मोठे परिश्रम घ्यावे लागतील. सध्या गटात पूर्वीच्या उमेदवारांसह पंचायत समिती सदस्य अनिल तेजा, येसगावचे दादा अहिरे, विनोद शेलार, नंदलाल नंदाळे आदींसह अन्य काही इच्छुकांच्या नावांची चर्चा सुरू आहे.
गट विभाजनाचा फायदा कुणाला?
यंदा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आहे. निमगाव गटाचे विभाजन होणार असल्याचे समजते. या विभाजनाचा फायदा कोणत्या पक्षाला होणार, याची चर्चा होत आहे. यात आणखी दोन गट अस्तित्वात येणार आहेत. यात निमगाव गटातील गण नवीन सौंदाणे गटात जोडले जाणार तर सोनज टाकळी हा गट उदयाला येण्याच्या शक्यतेने मतांच्या विभाजनाचा फटका सर्व राजकीय पक्षांना बसणार आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी सोईस्कर गट शोधण्याचे काम सध्या बाशिंगवीर करत आहेत. तरीही हे आरक्षणाच्या निर्णयावर अवलंबून आहे. ऐनवेळी आपल्या जवळच्या उमेदवारांना प्राधान्य द्यावे लागेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.