महापालिकेत खड्ड्यांवरून राजकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 11:47 PM2020-09-17T23:47:23+5:302020-09-18T01:25:03+5:30
नाशिक : शहरातील रस्त्यांची चाळण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. यासंदर्भात महापौरांनी आदेश देऊनही आधी प्रशासन हालले नव्हते. मात्र आता ३० कोटी रुपयांंच्या निविदा देण्याची धावपळ सुरू झाली आहे. विरोधी पक्ष आक्रमक झाले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीने भाजपला लक्ष्य केले असून, या खड्ड्यांना सत्ताधिकारी भाजपच जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे, तर भ्रष्टाचाराचे खड्डे न बुजविल्यास महापालिकेत डांबर ओतण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिला आहे.
नाशिक : शहरातील रस्त्यांची चाळण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. यासंदर्भात महापौरांनी आदेश देऊनही आधी प्रशासन हालले नव्हते. मात्र आता ३० कोटी रुपयांंच्या निविदा देण्याची धावपळ सुरू झाली आहे. विरोधी पक्ष आक्रमक झाले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीने भाजपला लक्ष्य केले असून, या खड्ड्यांना सत्ताधिकारी भाजपच जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे, तर भ्रष्टाचाराचे खड्डे न बुजविल्यास महापालिकेत डांबर ओतण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिला आहे. शहरात यंदा खूप पाऊस झाला नाही; मात्र सर्वत्र खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्याची चाळण झाली आहे. रस्त्यात खड्डे, की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न अनेक रस्त्यांच्या बाबतीत निर्माण झाला आहे. यासंदर्भात महापौर सतीश कुलकर्णी यांनी आॅगस्ट महिन्याच्या अखेरीस बांधकाम विभागाची बैठक घेऊन आठ दिवसात खड्डे बुजवून शहर खड्डे मुक्त करण्याचे आदेश दिले होते. मात्र अद्याप खड्डे जैसे थे आहेत. परंतु आता खड्डे बुजवण्यासाठी तीस कंत्राट काढण्याची तयारी सुरू झाली आहे. महापालिकेचा बांधकाम विभाग व गुणवत्ता विभाग यांच्या हलगर्जीपणा शहराची अवस्था बिकट झाली आहे. प्रशासनाच्या कंत्राटदारांना पोसण्याच्या उद्योगामुळे नाशिककरांना दरवर्षी खड्ड्यांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप त्यांनी केला. रस्त्यांच्या कामाचा गुणवत्ता राखण्याचा बांधकाम विभाग व मनपाचा गुणवत्ता नियंत्रण विभागाचा विसर पडल्याचा आरोप करून आम्ही मात्र ही जबाबदारी विसरू देणार नाही, असा इशारादेखील बोरस्तेंनी दिला.
सिंहस्थ कुंभमेळ्यापासून आत्तापर्यंत महापाालिकेने चारशे ते पाचशे कोटी रुपये रस्त्यांवर खर्च केले आहेत. मात्र त्यानंतरही त्याच रस्त्यांवर खड्डे पडत असेल तर त्यास जबाबदार बांधकाम व गुणवत्ता नियंत्रण विभाग या दोघांची पोलखोल करावी लागेल, असे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी म्हटले आहे. महापालिकेत खड्डे बुजवण्याची मोनोपाली असून, वर्षानुवर्ष तेच तेच ठेकेदार डांबरीकरणाची कामे करतात, असा आरोप ठाकरे यांनी केला आहे. ठेक्यासाठी रिंंग करून कामे मिळवायची, निकृष्ट रस्ते तयार करायचे आणि रस्त्यांवर खड्डे पडले की ठेकेदारावर कारवाई करण्याचे सोडून खड्डे बुजवण्यासाठी पुन्हा नवीन कंत्राट काढायचे. महापालिकेतील भ्रष्टाचाराचे हे खड्डे बुजवणे गरजेचे झाले आहे. असे दुष्टचक्र महापालिकेत असून, आता खड्डे बुजवणे जमत नसेल तर मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष डांबर घेऊन हे काम करण्यास तयार आहे, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.