विकासाभोवती फिरणार राजकारण

By admin | Published: January 5, 2017 01:16 AM2017-01-05T01:16:18+5:302017-01-05T01:16:34+5:30

नामपूर गट : इच्छुकांकडून व्यूहरचना सुरू, गट आरक्षित झाल्याने अनेकांचे स्वप्न भंगले

Politics revolves around development | विकासाभोवती फिरणार राजकारण

विकासाभोवती फिरणार राजकारण

Next

शरद नेरकर नामपूर
नाशिक जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला आणि धुळे जिल्ह्याला लागून असलेल्या नामपूर गटात गेल्या पंचवार्षिकप्रमाणेच याही वेळेस सर्व पक्षांकडून इच्छुकांचा भरणा अधिक असल्याचे दिसून येत आहे. उमेदवारी मिळेल तेव्हा मिळेल, पण अनेकांनी निवडणुकीची व्यूहरचना आखायला सुरुवात केली आहे. गटात समस्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने विकासाच्या प्रश्नाभोवतीच यावेळच्या निवडणुकीची चक्रे फिरतील असे सध्याचे चित्र आहे.
बागलाण तालुका हा गेल्या अनेक पंचवार्षिकपासून राखीव आहे, तर जिल्हा परिषदेचा गट हा यापूर्वी जनरल होता. आता पुन्हा तो राखीव (पुरुष) झाला आहे. यात नामपूर जिल्हा परिषद गटात स्व. जयवंतराव सावंत, स्व. बाळासाहेब कापडणीस व नारायणमामा कोर हे किंगमेकरच्या भूमिकेत असत. नामपूर जिल्हा परिषद गट हा तसा ३० हजार मतदारांचा मतदारसंघ. नामपूर जिल्हा परिषद गटात अनेक खादीधारी नेतेमंडळी आहेत. मात्र आरक्षण सोडतीत हा गट आदिवासी पुरुष आरक्षित झाल्याने मिनी मंत्रालय बघण्याचे अनेकांचे स्वप्न भंगले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच अनेकांकडून उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त होत आहे. उमेदवारांच्या वागणुकीत बदल जाणवत असून, ‘होम टू होम’ गाठीभेटी घेताना दिसत आहेत. ‘काय हवं, काय नको’ याचीही काळजी घेतली जात असल्याची चर्चा मतदारांत होताना दिसत आहे.
या गट-गणात यापूर्वी अनेक उमेदवार निवडून गेलेत; मात्र समस्या काही संपत नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून रस्ता, वीज, पाणी, घरकुले या अत्यावश्यक गरजा आजही प्रलंबित आहेत. मागील वेळी सर्वच उमेदवारांनी भरभरून आश्वासने दिली, पण समस्या आजही ‘जैसे थे’च आहेत.
या गटात मराठा कार्ड महत्त्वाचे मानले जाते. मराठा नेतृत्व व हा समाज निवडणुकीचा कल सहज फिरवू शकतो हा आजवरचा इतिहास आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत जनरल गटात कै. रमेशभाऊ कुलकर्णी या ब्राह्मण समाजाच्या उमेदवाराव्यतिरिक्त एकही इतर समाजाचा उमेदवार निवडून आलेला नाही. अशोकराव सावंत, प्रा. गुलाबराव कापडणीस, सुनीता पाटील या मराठा समाजाच्या उमेदवारांनी घवघवीत यश संपादन करून आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले आहे. अल्पसंख्याक समाजाव्यतिरिक्त या गटात भिल्ल समाजाचे मतदानही तेवढेच निर्णायक असते. गटात भिल्ल समाजाचे मतदान मोठ्या प्रमाणावर असून, हा समाज ज्या उमेदवाराचे समर्थन करेल तो उमेदवार विजयापर्यंत पोहोचण्याची शक्यता अधिक असते. दिलीप मंगळू बोरसे, उमाजी बोरसे, सोमनाथ सोनवणे व कन्हुराज गायकवाड ही या समाजाची मातब्बर मंडळी. यांचे समर्थन मिळविण्यासाठी सर्वच उमेदवार प्रयत्न करतात, तर जिजाबाई सोनवणे यांनीही काही वर्षे सभापतिपद भूषविले आहे. आजही त्या सभापती आहेत. भिल्ल समाजाचे लक्ष्मण तोताराम पवार हे एकलव्य संघटनेचे आमदार होते. थोडक्यात, भिल्ल समाजही या गटात निर्णायक आहे. वाणी, मारवाडी, ब्राह्मण, माळी, तेली व मुसलमान या समाजाच्या मंडळींची मतेसुद्धा नजरेआड करता येणार नाहीत.
या गटात मुस्लीम समाजाचे मतदार कमी आहेत. हा गट तसा काँग्रेसचा आहे. मात्र गेल्या दशकापासून भाजपाचे काम येथे वाढताना दिसत आहे. हिंदुत्वाचा पगडा या मतदारसंघावर आहे. शेतकरी संघटनेचेही अनेक कार्यकर्ते येथे आहेत. भाजपाला येथून आमदारकीही मिळाली आहे. शेतकरी संघटनेचे शरद जोशी यांच्या विचारसरणीचा बागलाणात आजही प्रभाव दिसून येतो. अंबासन हे त्यापैकी एक गाव. म्हणूनच शेतकरी संघटनेचे दिलीप मंगळू बोरसे यांनी विधानसभेत आवाज उठवला होता. थोडक्यात, शेतकरी संघटनेलासुद्धा एक आमदार बागलाणने दिला असून, त्यात नामपूर गट व अंबासन गणाचा सिंहाचा वाटा आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना, मनसे, शेतकरी संघटना यांचे उमेदवार निवडणूक लढवितात. येथे पक्ष म्हणून निम्मा विजय सोपा होतो, तर मनसेचे सतीश विसपुते, स्व. अंबादास अहिरे (रातीर) ही मंडळी गणात आपापल्या कर्तृत्वाने स्वबळावर निवडून येतात. थोडक्यात, हा गट व गण पक्षाबरोबरच व्यक्तिगत कार्यकर्तृत्वाचा विचार करणारा आहे.

Web Title: Politics revolves around development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.