४२२७ गावकारभाऱ्यांसाठी आज मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:13 AM2021-01-15T04:13:10+5:302021-01-15T04:13:10+5:30
नाशिक : जिल्ह्यातील ५६५ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि. १५) मतदान होत असून, या निवडणुकीत ४२२७ जागांसाठी ११,०५४ उमेदवार नशीब ...
नाशिक : जिल्ह्यातील ५६५ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि. १५) मतदान होत असून, या निवडणुकीत ४२२७ जागांसाठी ११,०५४ उमेदवार नशीब अजमावत आहेत. जिल्ह्यातील १ हजार ९५२ मतदान केंद्रांवर मतदार मतदानाचा हक्क बजावतील. मतदान प्रक्रियेप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
डिसेंबरअखेर मुदत संपुष्टात आलेल्या जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ५५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, उमराणे येथील निवडणूक रद्द करण्यात आली. त्यामुळे उर्वरित ५६५ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. १२ लाख ८४ हजार १०९ इतके मतदार मतदानाचा हक्क बजावतील. जिल्ह्यात ४४ ग्रामपंचायती या संवेदनशील असून, अतिसंवेदनशील ग्रामपंचायतींची संख्या ८ आहे. मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
मतदानाच्या आदल्या दिवशी निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदान साहित्यांचे वाटप करून त्यांना आपापल्या मतदान केंद्रांवर रवाना करण्यात आले आहे. वाहनांमधून कर्मचारी आणि मतदानाचे साहित्य मतदान केंद्रांवर पोहोचविण्यात आले आहे. जिल्ह्यातील ५५ ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या आहेत, तर १६२२ जागा या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. उर्वरित जागांसाठी शुक्रवारी मतदारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे.