जिल्ह्यातील ५६५ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:17 AM2021-01-16T04:17:54+5:302021-01-16T04:17:54+5:30
या निवडणुकीत ५५ ग्रामपंचायती अगोदरच बिनविरोध निवडून आलेल्या असून, १,६२२ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया ...
या निवडणुकीत ५५ ग्रामपंचायती अगोदरच बिनविरोध निवडून आलेल्या असून, १,६२२ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. ४,२२७ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुमारे पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गुरुवारी मतदान केंद्राचा ताबा घेतला असून, सकाळी ७.३० वाजता मतदानास सुरुवात होणार आहे. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे. अखेरच्या अर्ध्या तासात कोरोनाबाधित किंवा संशयित रुग्णांना सोशल डिस्टन्स नियमाचे पालन करून मतदान करता येणार आहे. या निवडणुकीत ६,११,६५४ स्त्री मतदार, तर ६,७२,४५३ पुरुष मतदार, असे एकूण १२ लाख ८४ हजार १०९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
दरम्यान, या निवडणुकीसाठी ३८९ अधिकारी, तर ९,७६० इतके कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. महामंडळाच्या ६१ बसच्या माध्यमातून, तसेच ४०२ जीप आणि १२६ मिनी बसच्या माध्यमातून मतदान केंद्रांवर निवडणुकीचे साहित्य रवाना करण्यात आले. मतदानासाठी २,५६० कंट्रोल युनिट, तर तितकेच बॅलेट, असे एकूण ५,१२० युनिटस् १,९५२ मतदान केंद्रांवर पोहोचले आहेत. सायंकाळच्या सुमारास संवेदनशील ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात पोलिसांनी संचलन केले.