प्रशासनाकडून मतदान केंद्रांचे सर्वेक्षण
By admin | Published: December 23, 2016 01:02 AM2016-12-23T01:02:02+5:302016-12-23T01:02:17+5:30
निवडणूक तयारी : सोयीसुविधांचा आढावा
नाशिक : फेबु्रवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी शहरात उभारण्यात येणाऱ्या मतदान केंद्रांचे सर्वेक्षण प्रशासनाने सुरू केले असून, केंद्राच्या ठिकाणी असलेल्या सोयीसुविधांचा आढावा घेतला जात आहे. सर्वेक्षणात प्रामुख्याने, महापालिकेच्या शाळा इमारतींमध्ये मूलभूत सोयीसुविधांबाबत अडचणी निदर्शनास येत आहेत. दरम्यान, निवडणुकीसाठी यंदा सुमारे १३५० मतदान केंद्रांची संख्या राहण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारी चालविली आहे. मागील निवडणुकीत ९ लाख ६९ हजार मतदारांची संख्या होती. यंदा, महापालिकेने नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याने सुमारे सव्वा लाख मतदारसंख्या नव्याने वाढली आहे. त्यामुळे यंदा मतदान केंद्रांच्याही संख्येत वाढ होणार आहे. प्रामुख्याने, १३५० च्या आसपास मतदान केंद्रे असण्याची शक्यता असून, प्रत्येक बूथवर ७५० ते ८५० मतदारसंख्या असणार आहे. शहरात उभारण्यात येणाऱ्या मतदान केंद्रांची यादी संकलित केल्यानंतर महापालिकेने आता बांधकाम विभागामार्फत केंद्राच्या ठिकाणी आवश्यक त्या मूलभूत सोयीसुविधा आहेत किंवा नाही, याबाबतचे सर्वेक्षण सुरू केले आहे. बांधकाम विभागाने त्यासाठी कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले असून, पथकामार्फत माहिती संकलित केली जात आहे. मतदान केंद्रांसाठी महापालिकेच्या शाळा इमारतींसह खासगी शाळांचाही समावेश असणार आहे. त्यामुळे सदर ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, विद्युत व्यवस्था, सुरक्षास्थिती, अपंग मतदारांसाठी रॅम्पची व्यवस्था, खोल्यांची स्थिती या साऱ्या मूलभूत सोयीसुविधांचा आढावा घेतला जात आहे. सदर सर्वेक्षणात महापालिका शाळांच्या इमारतींमध्ये बऱ्याच ठिकाणी स्वच्छतागृहांची अवस्था दयनीय असल्याचे निदर्शनास आले आहे, तर काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याचे समोर आले आहे. बव्हंशी ठिकाणी रॅम्पचीही सुविधा नाही. मनपा शाळा इमारतींच्या तुलनेत खासगी शाळांमध्ये मात्र सर्व सुविधा आढळून आल्या आहेत. सर्वेक्षणात आढळून येणाऱ्या त्रुटी लक्षात घेऊन सदर मतदान केंद्रांच्या ठिकाणी सोयीसुविधांवर भर दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)