युवक कॉँग्रेसच्या पदाधिकारी निवडीसाठी रविवारपासून मतदान
By श्याम बागुल | Published: September 8, 2018 04:56 PM2018-09-08T16:56:39+5:302018-09-08T16:58:16+5:30
खासदार राहूल गांधी यांच्या संकल्पनेतून क्रियाशील कार्यकर्त्यांमधून उमेदवार निवडण्याची प्रक्रिया कॉँग्रेस पक्षाने सुरू केली असून,दर तीन वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीसाठी गेल्या वेळी नाशिक लोकसभा मतदार संघ मिळून शहर अध्यक्षपद राखीव गटासाठी तर दिंडोरी मतदार संघ मिळून जिल्हाध्यक्षपद
नाशिक : युवक कॉँग्रेसच्या विधानसभा मतदार संघ प्रमुख निवडीबरोबरच शहर व जिल्हाध्यक्ष निवडीसाठी रविवारपासून जिल्ह्यात आॅनलाईन पद्धतीने मतदान घेण्यात येणार असून, या निवडणुकीसाठी ४२ उमेदवार रिंगणात असल्याने जिल्ह्यातील ९७०० क्रियाशील कार्यकर्ते आपला मतदानाचा हक्क बजावतील.
खासदार राहूल गांधी यांच्या संकल्पनेतून क्रियाशील कार्यकर्त्यांमधून उमेदवार निवडण्याची प्रक्रिया कॉँग्रेस पक्षाने सुरू केली असून,दर तीन वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीसाठी गेल्या वेळी नाशिक लोकसभा मतदार संघ मिळून शहर अध्यक्षपद राखीव गटासाठी तर दिंडोरी मतदार संघ मिळून जिल्हाध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी राखीव होते. यंदा शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्ष दोन्ही पदे सर्वसाधारण गटासाठी ठेवण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यातील नाशिक शहरातील चार व इगतपुरी विधासभा मतदार संघातून एक शहराध्यक्ष तर उर्वरित दहा विधानसभा मतदार संघातून एक जिल्हाध्यक्ष निवडण्यात येणार आहे. त्यासाठी युवक कॉँग्रेसचे जिल्ह्यात ९७०० क्रियाशील कार्यकर्ते मतदान करतील. प्रत्येकाला पाच मते देण्याचा अधिकार आहे. त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघ प्रमुखपदाबरोबरच प्रदेशाध्यक्ष, प्रदेश महासचिव, जिल्हाध्यक्ष, जिल्हा महसचिव व शहराध्यक्षाला मतदान करावे लागणार आहे. जिल्ह्यात या निवडणुकीसाठी ४२ उमेदवार रिंगणात असून त्यासाठी पॅनलही तयार करण्यात आले आहे. रविवारी सिन्नर, निफाड व येवला येथे तर सोमवारी दिंडोरी, कळवण, चांदवड या तालुक्यात मतदान घेण्यात येईल. मंगळवारी बागलाण, मालेगाव बाह्य, मध्य विधासभा मतदार संघात मतदान होईल. बुधवार दि. १२ रोजी दिल्लीहून या निवडणूकीचा निकाल जाहीर करण्यात येईल.
चौकट====