सायकल रॅलीतून प्रदूषणमुक्तीचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 11:29 PM2019-06-02T23:29:13+5:302019-06-03T00:07:05+5:30
जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक शहरामध्ये सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
नाशिक : जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक शहरामध्ये सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या सायकल रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी तथा नाशिक स्मार्ट सिटीचे संचालक सूरज मांढरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झाले.
या सायकल रॅलीत पाणी वाचवा, सायकल चालवा फिट रहा आणि शहर प्रदूषणमुक्त ठेवा असा संदेश दिला गेला. सायकल रॅलीच्या सुरु वातीला जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बोलताना सांगितले की, सायकल सोपा व्यायाम आहे. सायकल ही कधीही व कुठेही चालवता येते. व्यायामासाठी जास्त खर्चही येत नाही. सर्वांसाठी हा उत्तम व्यायाम प्रकार आहे.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: सायकल चालवत सायकल रॅलीमध्ये सहभाग घेतला. या कार्यक्रमाला नाशिक स्मार्ट सिटीचे पर्यावरण महाव्यवस्थापक सुनील विभांडिक, हक्सी सायकलचे व्यवस्थापक सचिन मोरे, नाशिक सायकलिस्ट प्रवीण खाबिया आदी उपस्थित होते. सायकल रॅलीत नाशिक शहरातील युवक-युवती, वयोवृद्ध नागरिक, महिला यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सकाळी निघालेल्या सायकल रॅलीचा नाशिक शहरातील गोल्फ क्लब मैदान, मायको सर्कल, त्र्यंबकरोड सर्कल, सिटी मॉलरोड, मायको सर्कल, चांडक सर्कल, एसएसके हॉटेल येथे समारोप झाला.
सायकलमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत
स्मार्ट सिटीच्या माध्यमातून नाशिक शहरात शंभर सायकल स्टॅण्ड व एक हजार सायकली उपलब्ध केल्यामुळे नाशिक शहरात सायकलचा वापर करणाºया नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही सायकल चळवळ सर्व शाळा, महाविद्यालय, शासकीय आॅफिस, खासगी कंपन्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. सायकलमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होते यासाठी सर्वांनी सायकलचा वापर केला पाहिजे, असे याप्रसंगी जिल्हाधिकारी मांढरे यांनी बोलताना सांगितले.